नंदुरबार l प्रतिनिधी-
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती जिल्हा नंदुरबार च्या वतीने सामूहिक कन्या पूजनाचा कार्यक्रम दहिंदुले ता जि नंदूरबार येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी जनजाती समाजातील 108 कन्यांचे पूजन व गौरव करण्यात आला.
या वेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते देवमोगरा माता, सप्तशृंगी माता, भारत माता यांचे प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
प्रास्ताविकात कार्यक्रमाची भूमिका विशद करताना समितीचे कार्यवाह उमेश शिंदे म्हणाले की, भारतीय संस्कृतीत नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने घराघरात कन्यापूजन होत असते. स्त्री शक्तीचा सन्मान करण्याची भावना यातून समाजात दिसून येते. धार्मिकते सोबतच सामाजिक दायित्व निभावण्यासाठी आजच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
यावेळी 108 कन्यांचे धार्मिक पद्धतीने चरण प्रक्षालन व पाद्यपूजन सेवासहयोगी अभय व अंजलीबेन अग्रवाल तसेच माताजी पिताजी कन्हैयालाल व कांताबेन अग्रवाल खुराल मेडिकल परिवार यांनी केले. तसेच कन्याकांना सामूहिक अल्पोहार व मिष्ठान्न, मंगल वस्र स्वरूपात ड्रेस, सौंदर्यसाधने, शैक्षणिक साहित्य आदि वाटप उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी देवगिरी कल्याण आश्रमचे प्रांत सहसचिव वीरेंद्र वळवी यांनी अशा प्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन मोठ्या प्रमाणात व्हावे असे प्रतिपादन केले.

समितीच्या जिल्हा उपाध्यक्षा प्रितीताई बडगुजर यांनी जनकल्याण समितीच्या माध्यमातून सर्व समाजाला सोबत घेऊन पुढे जाण्याच्या भूमिकेने सातत्याने समाज उपयोगी कार्यक्रम राबवले जातात तसेच आपत्ती मध्ये धावून जाऊन समाजाला आधार देण्याचे कार्य करण्यात येते असे सांगितले.
यावेळी जनजाति सुरक्षा मंच चे प्रांत संयोजक डॉ. विशाल
वळवी, कल्याण आश्रमचे जिल्हा अध्यक्ष गिरीश वसावे, जनकल्याण समितीचे सुनिताताई पवार, हेमाताई रेखी, नरेंद्र जोशी, हर्षल पत्की, यश रेखी, जनशिक्षण समितीचे उपाध्यक्ष गिरिष बडगुजर दहिंदुले बुद्रुक चे सरपंच ताईबाई वसावे व उपसरपंच दिपक मराठे, दहिंदुले खुर्द चे सरपंच बन्या ठाकरे उपसरपंच उमाकांत पटेल, पंचायत समिती सदस्य सीमाताई मराठे, जनजाती सुरक्षा मंच जिल्हा संयोजक रवींद्र वळवी, रमेश कोतवाल, राजू राजपूत, गंगाराम वळवी, जगदीश जाधव, हरीश मराठे यांच्यासह ग्रामस्थ व पालक मंडळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे पौरोहित्य अरविंदजी विंगळे गुरुजी व विजयराव गव्हाळे गुरुजी यांनी केले तसेच सूत्रसंचालन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तालुका कार्यवाह प्रमोद साळुंखे यांनी केले.








