नंदुरबार l प्रतिनिधी
शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाकडून सुरू असलेल्या माझी वसुंधरा अभियानांतर्गत नंदुरबार नगर परिषदेने नाशिक विभागात अव्वल क्रमांक प्राप्त केला असून, दीड कोटींचे बक्षीस शासनाने जाहीर केले आहे.
शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाकडून सुरू असलेल्या माझी वसुंधरा अभियान अंतर्गत नंदुरबार नगरपरिषदेने गेल्या वर्षी १ एप्रिल २०२३ ते ३१ मे २०२४ या कालावधीत स्वतः ची रोपवाटिका तयार करणे, मियावाकी पद्धतीने घनवन तयार करणे, शाळा- महाविद्यालय यांचेमार्फत संपूर्ण शहरात जनजागृती अभियान- चित्रकला स्पर्धा,
रांगोळी स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, वृक्ष दिंडी, वसुंधरा प्रतिकृती चे सेल्फी पॉइंट तयार करणे असे विविध जनजागृती उपक्रम राबविणे, इ- विहीकल चार्जिंग पॉइंट बनविणे, शहरातील हवेची गुणवत्ता तपासणी इ. क्षेत्रात उल्लेखनीय कामे केलेली होती. शासन नियुक्त त्रयस्थ यंत्रणेमार्फत नगरपालिकेने केलेल्या कार्यवाहीचे डेस्कटॉप व फील्ड मूल्यमापन करण्यात आलेले होते. या दोन्ही मूल्यमापनातील एकूण गुणांच्या आधारे लोकसंख्यानिहाय गटातील विजेत्या स्थानिक स्वराज्य संस्थांची निवड करण्यात आलेली असून अंतिम निकाल जाहीर करण्यात आलेला आहे.
जाहीर करण्यात आलेल्या निकालानुसार अमृत गट (विभागस्तर) यामध्ये अमृत मधील लोकसंख्येनिहाय तीनही गट एकत्रित करून विभागातील एकूण सर्व अमृत शहरांचा विचार करण्यात आला असून यामध्ये नाशिक विभागातून नंदुरबार नगरपरिषदेची निवड करण्यात आलेली असून नगरपालिकेला रु. १.५० कोटी चे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.
माझी वसुंधरा अभियान अंतर्गत पालिकेचे तत्कालीन मुख्याधिकारी अमोल बागूल यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पाणीपुरवठा अभियंता तथा नोडल अधिकारी अभिजित मोहिते, शहर समन्वयक रमेश निकम, हिमांशु परदेशी तसेच पालिकेचे सर्व विभाग प्रमुख व कर्मचारी, आरोग्य कर्मचारी यांनी उल्लेखनीय कामकाज केले आहे. शिवसेनेचे संपर्कप्रमुख तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी,पालिकेच्या माजी नगराध्यक्ष सौ.रत्ना रघुवंशी यांनी कर्मचाऱ्यांचे कौतुक केले आहे.
गेल्या दोन दशकांपासून सत्ता काळात नगरपरिषदेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर शहरात विविध विकास कामे केली आहेत. शासनाने आयोजित केलेल्या विविध अभियानात पालिकेने सक्रिय सहभाग घेतलेला आहे. यामध्ये अधिकारी, कर्मचारी त्याचप्रमाणे नगरसेवकांनी देखील सहभाग घेतला. माझी वसुंधरा अभियानांतर्गत नाशिक विभाग स्तरावर नगरपरिषदेला दीड कोटींचे बक्षीस जाहीर झाले असून, शासन स्तरावरून प्रामाणिक व निरपेक्ष कामाची पावती मिळाली आहे.
सौ.रत्ना रघुवंशी,
माजी नगराध्यक्ष, नगरपरिषद