नंदुरबार l प्रतिनिधी-
येणाऱ्या विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणूका सहज, शांततामय व निष्पक्ष वातावरणात होतील, याची दक्षता घेण्याबरोबरच निवडणूक कामकाजात कर्तव्यावर असलेल्या सर्व यंत्रणांनी निवडणूक कर्तव्यांचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश आज राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव एस. चोकलिंगम यांनी दिले आहेत.
ते आज जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने आयोजित अधिकारी व नोडल अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. सावनकुमार, जिल्हा पोलीस अधिक्षक श्रवण दत्त, अप्पर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे, सहाय्यक जिल्हाधिकारी, (नंदुरबार) अंजली शर्मा, अनय नावंदर (तळोदा), उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रमोद भामरे, निवासी उपजिल्हाधिकारी हरिष भामरे, जिल्हा पुरवठा अधिकारी गणेश मिसाळ, जिल्हा शल्य चिकित्सक वर्षा लहाडे, उपजिल्हाधिकारी सर्वश्री गोविंद दाणेज, महेश चौधरी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अंकुश पालवे, सामाजिक न्याय विभागाचे सहाय्यक आयुक्त सुंदरसिंग वसावे, उपविभागीय अधिकारी (शहादा) सुभाष दळवी, तसेच सर्व तालुक्यांचे तहसीलदार, गट विकास अधिकारी, नगरपरिषदांचे मुख्याधिकारी बैठकीस उपस्थित होते.
यावेळी बोलताना एस. चोकलिंगम म्हणाले, प्रत्येक मतदाराला मतदान करणे सहज शक्य होईल याची काळजी घेणे निवडणूक प्रशासनाने घ्यावी. त्यात प्रामुख्याने दिव्यांग, वयोवृद्ध मतदारांसाठी विशेष काळजी घेण्यात यावी. प्रत्येक मतदान केंद्रावर मुलभूत सेवा-सुविधा, पाणी, प्राथमिक आरोग्य उपचारांच्या बाबतीत सतर्कता बाळगावी. आरोग्य विषयक कुठलीही आपत्ती निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी.
पोलीस प्रशासनाने प्रत्येक विधानसभा क्षेत्राच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांशी समन्वयाने गर्दीचे नियोजन करावे. तसेच आंतरराज्य सीमांवरील चेकपोस्टवर रोख रक्कम व बेकायदेशीर मद्यसाठ्यांच्या वाहतुकीवर प्रतिबंधात्मक कारवाईचे सुक्ष्म नियोजन करावे. तसेच आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी करताना नियमित प्रचारसभा व स्टार प्रचारकांच्या सभेचे किमान 5 मिनिटांचे व्हिडिओ चित्रिकरण करावे. बेताल, प्रक्षोभक, वादग्रस्त व चुकीच्या वक्तव्यांचे काटेकोर चित्रिकरण करण्यात यावे.
ते पुढे म्हणाले, यावेळी निवडणुक कर्तव्यावर नियुक्त अधिकारी व कर्मचारी यांना डिजिटल ओळखपत्र देण्यात यावीत त्यासाठी लाईव्ह फोटोसह संग्रहित फोटो अपलोड करून दिल्यास ते अधिक सुलभ व गतिमानतेने होईल. निवडणूक कर्मचाऱ्यांना दिले जाणारे मानधन थेट त्यांच्या बॅंक खात्यात जमा करण्यात यावे.
त्यासाठी पहिल्या प्रशिक्षणात त्यांच्याकडून बॅंक खात्याची माहिती भरून घ्यावी, टोकन रू. 1/- मात्र खात्यात जमा झाल्याची खात्री दुसऱ्या प्रशिक्षणात करून घ्यावी. झोनल ऑफिसर हा निवडणूक कार्यक्रमाचा कणा असून त्यांच्या प्रशिक्षणाचे सुक्ष्म नियोजन करण्यात यावे. काटेकोर आणि वेळेत डेटा व रिपोटींग करण्याच्या सूचना त्यांना जबाबदारीपूर्वक देण्यात याव्यात. इ.व्हि.एम. व्यवस्थापन करताना काळजीपूर्वक करण्यात यावे. कर्मचारी आणि अधिकारी यांना मतदानाच्या कर्तव्य बजावताना येणाऱ्या अडचणींचा मानवतेच्या भावनेतून विचार करण्याच्याही सूचना यावेळी एस. चोकलिंगम यांनी दिल्या आहेत.
मतदार ओळखपत्र प्रत्येक नागरिकांना घरपोच वितरीत करण्यासाठी पोस्ट खात्यासोबत सामंजस्य करार करण्यात आला आहे, त्या माध्यमातून मतदान ओळखपत्र वितरणाचे नियोजन सहज व सुलभ होत असल्यास ते करण्यात यावे. ज्या विधानसभा मतदारसंघात मतदानाची टक्केवारी कमी आहे, त्या मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर मतदार जनजागृतीवर भर देण्यात यावा. समाजमाध्यमे व इतर माध्यामांमधून येणाऱ्या फेक न्यूजवर पोलीसांच्या सायबर क्राईम शाखेने जिल्हा माहिती अधिकाऱ्यांच्या समन्वयातून तात्काळ निराकरण करावे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी सर्व सादरीकरण केले. यावेळी झालेल्या चर्चेत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. सावनकुमार, जिल्हा पोलीस अधिक्षक श्रवण दत्त, अप्पर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे, सहाय्यक जिल्हाधिकारी, (नंदुरबार) अंजली शर्मा, अनय नावंदर (तळोदा), उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रमोद भामरे, निवासी उपजिल्हाधिकारी हरिष भामरे, जिल्हा पुरवठा अधिकारी गणेश मिसाळ, जिल्हा शल्य चिकित्सक वर्षा लहाडे, उपजिल्हाधिकारी सर्वश्री गोविंद दाणेज, महेश चौधरी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अंकुश पालवे, सामाजिक न्याय विभागाचे सहाय्यक आयुक्त सुंदरसिंग वसावे, उपविभागीय अधिकारी (शहादा) सुभाष दळवी, तसेच सर्व तालुक्यांचे तहसीलदार, गट विकास अधिकारी, नगरपरिषदांचे मुख्याधिकारी यांनी सहभाग घेतला.