नंदुरबार l प्रतिनिधी-
‘मिशन कवच कुंडल’ मोहिमेतंर्गत सुरु करण्यात आलेली लसीकरणाची मोहिम यशस्वी करण्यासाठी गाव, पाडे, तालुका तसेच प्रभाग निहाय सुक्ष्म नियोजन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी मनीषा खत्री यानी दिले.
जिल्हा टास्क फोर्सची बैठक जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली आज संपन्न झाली. बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, सहायक जिल्हाधिकारी मैनक घोष, निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.महेंद्र चव्हाण, डॉ. राजेश वसावे आदि उपस्थित होते.
यावेळी बोलताना श्रीमती खत्री म्हणाल्या की, 8 ते 14 ऑक्टोंबर दरम्यान जिल्ह्यात ‘मिशन कवच कुंडल’ मोहिम राबविण्यात येत असून लसीकरणाचा वेग वाढावा यासाठी लसीकरण न झालेल्या नागरिकांचे लसीकरण करावे यासाठी आरोग्य विभाग, लोकप्रतिनिधींसह तलाठी, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका, आशा कार्यकर्ती, स्वयंसेवी, सामाजिक संस्थांची मदत घ्यावी. लहान गावात 100 टक्के लसीकरण करावे त्यासाठी तालुकास्तरावर उद्दिष्ट देण्यात यावेत.
धडगाव तसेच अक्कलकुवा तालुक्यात लसीकरणाचे प्रमाण वाढविण्यासाठी गावनिहाय शिबीरांचे आयोजन करावे. त्यासाठी दवंडी देणे, गृहभेटी, सार्वजनिक ठिकाणी तसेच समाज माध्यमातून जनजागृती करावी. जिल्हा रुग्णालय तसेच ग्रामीण रुग्णालयात उपचार घेण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना लसीकरणासाठी प्रोत्साहित करावे. नगरपालिका, नगर पंचायतक्षेत्रात शिबीराचे आयोजन करावे, कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी अधिकारी-कर्मचाऱ्यांनी उत्तम काम केले असून लसीकरण मोहिम यशस्वी करण्यासाठी त्याचप्रमाणे नियोजनबद्ध काम करावेत अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
कोविड विषाणूच्या संभाव्य तिसऱ्या लाटेची तीव्रता कमी करण्यासाठी नागरिकांच्या सहकार्याची आवश्यकता आहे. लसीकरणामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने नागरिकांनी मार्गदर्शक सुचनांचे पालन करण्यासोबतच लसीकरणही करून घ्यावे, असे आवाहनही श्रीमती खत्री यांनी यावेळी केले.
बैठकीस नगरपालिकेचे मुख्याधिकारी, तालुका वैद्यकीय अधिकारी तसेच विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
कोविड-19 लसीकरण जनजागृती रथाचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते शुभारंभ
पिरामल स्वास्थ्य संस्थेतर्फे कोरोना लसीकरण जनजागृतीसाठी तयार केलेल्या रथास जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ केला. या जनजागृतीपर रथामार्फत अक्कलकुवा व धडगाव तालुक्यातील अतिदुर्गम भागात नागरिकांमध्ये लसीकरणाची जनजागृती करण्यात येणार असून अतिदुर्गम भागातील नागरिकांना लसीकरणासाठी शिबीरात घेवून जाण्यासाठी या वाहनाचा वापर करण्यात येणार असल्याची माहिती पिरॅमल स्वास्थ्यचे निलचंद्र शेंडे यांनी यावेळी दिली.








