नंदुरबार l प्रतिनिधी
नाशिकहून – शहाद्याकडे येणाऱ्या राज्य परिवहन मंडळाच्या एसटी बसवर शहादा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसर शिवतिर्थ ते सप्तशृंगी मंदिरासमोर अज्ञात इसमाने दगडफेक केल्याची घटना काल 21 जुलै रोजी रात्री साडे नऊ वाजे दरम्यान घडली.घटनेची माहिती मिळताच पोलीस दल पोहोचले.त्यानंतर सदर बस सुरक्षितपणे शहादा आगारात आणण्यात आली.या दगडफेकीत काचा फुटल्या आहेत.
शहादा आगारातील बस ( क्र.एम. एच. 14, बी. टी.1722) ही नेहमीप्रमाणे काल 21 जुलै रोजी दुपारी नाशिक येथून शहादा कडे रवाना झाली. शहादा शहरात रात्री साडेनऊ वाजेच्या दरम्यान प्रवेश करत असताना श्री छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसर शिवतीर्थ ते सप्तशृंगी माता मंदिर परिसरात या बसवर अचानक दगडफेक सुरू झाली .या अचानक झालेला दगडफेकीमुळे प्रवाशांमध्ये घबराहट पसरली. चालक युसुफ व कंडक्टर रामा लोटे यांनी प्रसंगावधान राखत बस कुठेही न थांबता सरळ शहादा आगारात आणली या दगडफेकीत बसच्या पुढच्या काचांना थोडे नुकसान झाले असून सर्व प्रवासी सुरक्षित आहे.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचे पथक शहादा आगारात पोहोचले. घटनेची माहिती बसचे वाहन, चालक व प्रवाशांकडून घेत आहेत. या घटनेची पोलीस प्रशासनाने गंभीरपणे दखल घेतली असून सर्वत्र बंदोबस्त लावण्यात आला आहे. दरम्यान धुळे येथून चढलेल्या प्रवाशांमध्ये वाद झाल्याने दगडफेक झाल्याची माहिती मिळाली आहे याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.