नंदुरबार l प्रतिनिधी
येथील अग्रवाल भवन येथे नंदुरबार डिस्ट्रिक्ट इंडस्ट्रियल असोसिएशन आणि नंदुरबार डिस्ट्रिक्ट डेव्हलपमेंट कौन्सिल यांच्या वतीने महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँड एग्रीकल्चर चे नवनिर्वाचित अध्यक्ष ललित गांधी आणि इतर पदाधिकारी यांचा संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
जिल्ह्यातील औद्योगिक विकासास दिशा आणि गती मिळावी या उद्देशाने सदर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी ललित गांधींसोबत कैलास अग्रवाल, संगीता पाटील, गजेंद्र चौधरी, आशिष वाणी, पिकेश अग्रवाल, कृष्णा अग्रवाल, प्रकाश कोचर, ईश्वर पाटील आदी मान्यवर व्यासपीठावर होते.
मान्यवरांचा परिचय आणि सत्काराने कार्यक्रमास सुरुवात झाली. नंदुरबार डिस्ट्रिक्ट इंडस्ट्रियल असोसिएशनच्या वतीने पिकेश अग्रवाल यांनी मनोगत व्यक्त करत जिल्ह्यातील उद्योगासंबंधीची सद्यस्थिती, जिल्ह्याची भौगोलिक व सामाजिक रचना, आकांक्षीत जिल्ह्यामध्ये उद्योग उभारणीसाठी च्या अडचणी आणि उद्योजकांच्या अपेक्षा यावर प्रकाश टाकला.
आशिष वाणी यांनी नंदुरबार डिस्ट्रिक्ट डेव्हलपमेंट कौन्सिल तर्फे राबवण्यात येत असलेल्या विकसित नंदुरबार जिल्हा @ 2050 या उपक्रमाच्या माध्यमातून उद्योग विषयक झालेल्या अभ्यासातून समोर आलेल्या जिल्ह्याच्या उद्योग विषयी जन-आकांक्षा, अपेक्षा आणि निर्धार याबद्दल सभागृहास अवगत करून दिले. जिल्ह्याच्या कृषी-पूरक उद्योगासाठीची संसाधने, तयार असलेला अभ्यास, संशोधन याबद्दल माहिती देत जिल्ह्यात कृषी आधारित उद्योगांसाठीचे स्वतंत्र इंक्युबॅशन सेंटर, स्किल डेव्हलपमेंट सेंटर, ऍग्रो क्लस्टर या संदर्भातील गरज अधोरेखित केली.
चेंबरचे विश्वस्त कैलास अग्रवाल यांनी नंदुरबार जिल्ह्यातील उद्योजकांचे विशेषतः लघुउद्योजकांचे प्रोत्साहन पर मनोगत व्यक्त केले.
चेंबरच्या उत्तर महाराष्ट्र विभाग उपाध्यक्षा सौ. संगीता पाटील यांनी जिल्ह्यातील उद्योग विश्वात महिलांच्या सक्रिय सहभागाविषयी अपेक्षा व्यक्त करत नंदुरबारच्या स्थानिक लोककला, संस्कृती या माध्यमातून तयार झालेल्या वस्तूंना विपणन क्षेत्राशी जोडून घेऊन नवे व्यापारी दालन उघडण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले.
अध्यक्षीय भाषणात ललित गांधी यांनी अनेक विषयांवर दिलखुलास संवाद साधत नंदुरबार जिल्ह्यातील उद्योजकांकडून महाराष्ट्र आणि भारताच्या औद्योगिक इतिहासाच्या अभ्यासाची, त्यातून धडे घेण्याची आणि जिल्ह्यातील औद्योगिक विकासाचे स्वप्न पूर्ण करण्याची अपेक्षा व्यक्त केली. महाराष्ट्राचे सुपुत्र शेठ वालचंद हिराचंद यांच्या गौरवार्थ त्यांच्या माहीत नसलेल्या अनेक औद्योगिक उपलब्धींची माहिती गांधी यांनी उपस्थितांना दिली. अनेक महत्त्वाच्या उद्योग निर्मितीसाठीचे प्रोत्साहन वालचंद हिराचंद यांनी दिल्याचा त्यांनी उल्लेख केला. त्यातून प्रेरणा घेऊन महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स शतकीय कार्तिकीर्दीकडे वाटचाल करत असल्याचे गांधी म्हणाले.
नंदुरबार डिस्ट्रिक्ट डेव्हलपमेंट कौन्सिलच्या विकसित नंदुरबार जिल्हा @ 2050 जन-आकांक्षा, अपेक्षा आणि निर्धार या अभ्यासाच्या संकलनाबद्दल तसेच एकूणच एनडीडीसीच्या कार्याबद्दल गांधी यांनी गौरवोद्गार व्यक्त केले. नंदुरबारच्या या उपक्रमाचा इतर जिल्ह्यांनी आदर्श घ्यायला हवा आणि आपापल्या जिल्ह्याच्या आकांक्षांची नोंद करायला हवी असे मत हे त्यांनी व्यक्त केले.
यादरम्यान नंदुरबारला एक स्वतंत्र कौशल्य विकास केंद्र, इनक्युबेशन सेटर, ऍग्रो क्लस्टर, बांबू उत्पादन तसेच बांबूच्या वस्तूंचे उत्पादन आणि विपणन यासाठी केंद्र स्थापन करण्याची घोषणा यावेळी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स तर्फे करण्यात आली.
जिल्ह्यातील उद्योजकांनी कमतरतांचे रडगाणे न गाता आव्हाने स्वीकारून इतरांसाठी आदर्श स्थापन करत नंदुरबार जिल्हा औद्योगिक वसाहतीला क्रमांक एक वर नेण्याची जिद्द बाळगावी असे आवाहन देखील केले. यावेळी नंदुरबार येथे चेंबर ऑफ कॉमर्स चे जिल्हा कार्यालय स्थापण्यासाठी देखील प्रयत्न होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
लघुउद्योग भारतीचे जिल्हा अध्यक्ष गजेंद्र चौधरी व उद्योजक व नंदुरबार डिस्ट्रिक्ट डेव्हलपमेंट कौन्सिल चे पिकेश अग्रवाल यांची महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या गव्हर्निंग कौन्सिल सदस्य पदी नेमणुकीची घोषणा देखील यावेळी ललित गांधी यांनी केली.
उपस्थित उद्योजकांतर्फे मान्यवरांचे यावेळी सत्कार करण्यात आले.Bकार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पिकेश अग्रवाल, कृष्णा अग्रवाल, यांनी परिश्रम घेतले.
नाशिक येथील चेंबरचे सहसचिव अविनाश पाठक तसेच सल्लागार दिलीप साळवेकर यांची विशेष उपस्थिती लाभली.
सूत्रसंचालन आर्कि. नीरज देशपांडे यांनी तर आभार प्रदर्शन गजेंद्र चौधरी यांनी मानले .