नंदुरबार l प्रतिनिधी
बालरंगभूमी परिषद नंदुरबार जिल्हा शाखा व गाडगेबाबा शैक्षणिक व सांस्कृतिक सेवा मंडळ शिंदे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित बालनाट्य प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन येथील कमला नेहरु कॅम्पस सभागृहात कमला नेहरू बी.एस.एम. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय मराठे यांच्या हस्ते नटराज पूजन करून करण्यात आले. या सात दिवशीय बालनाट्य प्रशिक्षण दरम्यान योगासन, संगीत, नेपथ्य, प्रकाश योजना आदीबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून कमला नेहरू प्राथमिक विद्या मंदिरचे मुख्याध्यापक राहुल मोरे, पत्रकार राकेश कलाल, वास्तूविशारद तज्ञ नीरज देशपांडे, नाट्य प्रशिक्षक हनुमान सुरवसे, बालरंगभूमी परिषद नंदुरबार जिल्हा शाखेचे अध्यक्ष राजेश जाधव आदी उपस्थित होते. बालनाट्य प्रशिक्षण शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी डॉ.संजय मराठे म्हणाले की, या बालनाट्य प्रशिक्षण शिबिराच्या माध्यमातून बाल कलावंतांचे व्यक्तिमत्व विकास घडायला नक्कीच मदत होईल.
या प्रशिक्षणातील बाल कलावंत भविष्यात नक्कीच मोठे कलावंत होतील असा विश्वास व्यक्त केला. या प्रसंगी नाट्य प्रशिक्षक हनुमान सुरवसे, कमला नेहरू प्राथमिक विद्यामंदिर चे मुख्याध्यापक राहुल मोरे, वास्तूविशारद तज्ञ नीरज देशपांडे यांनी देखील मनोगत व्यक्त केले. या वेळी बालरंगभूमी परिषद मध्यवर्ती शाखा मुंबईचे कार्यकारणी सदस्य नागसेन पेंढारकर यांनी प्रास्ताविकेतून बालनाट्य प्रशिक्षण शिबिराची भूमिका मांडली.
सूत्रसंचालन एस.एन.पाटील यांनी तर आभार राजेश जाधव यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी बालरंगभूमी परिषद नंदुरबार जिल्हा शाखेचे उपाध्यक्ष मनोज सोनार, सहकार्यवाहक राहुल खेडकर, जिल्हा प्रतिनिधी कुणाल वसईकर, जितेंद्र खवळे, जितेंद्र पेंढारकर, पार्थ जाधव, चिदानंद तांबोळी आदींनी परिश्रम घेतले.