नंदुरबार l प्रतिनिधी
सलग सत्ता भोगणाऱ्या आमच्या विरोधकांना नंदुरबार जिल्ह्यातील समस्या संपवणारा विकास मागील अनेक दशकात करता आला नाही. माझ्या खासदारकीच्या दहा वर्षाच्या कार्यकाळात त्यातील बहुतांश विकास कामे केंद्र सरकारच्या माध्यमातून आम्हाला करता आली. आता निवडणुकीला सामोरे जाताना लोकांना सांगण्यासारखे मुद्दे त्यांच्या काँग्रेस सह कोणत्याही विरोधकांच्या हाती राहिलेले नाहीत आणि म्हणूनच त्यांनी खोटं बोलून लोकांची दिशाभूल करणे चालवले आहे. परंतु जनता आमच्या सोबत असल्याचा आणि भारतीय जनता पार्टीलाच प्रत्येकाचे पहिल्या पसंतीचे मत टाकले जाईल याचा आम्हाला विश्वास आहे; या शब्दात महायुतीच्या उमेदवार महासंसद रत्न डॉ. हिना गावित यांनी विरोधकांना जाहीर उत्तर दिले.
शहादा तालुक्यातील सावळदे या गावी 28 एप्रिल 2024 रोजी रात्री आठ वाजता लोकनायक जयप्रकाश नारायण सहकारी सूतगिरणीच्या नवनिर्वाचित संचालकांचा सत्कार सोहळा महाराष्ट्राचे आदिवासी विकास मंत्री नामदार डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. त्याप्रसंगी डॉ.हिना गावित बोलत होत्या.
या सत्कार निमित्त पार पडलेल्या सभेला नंदुरबार जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ.सुप्रिया गावित, भारतीय जनता पार्टीचे महामंत्री विजय चौधरी, भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष निलेश माळी, जे पी एन सहकारी सूतगिरणीचे चेअरमन दीपक बापू पाटील, पूज्य साने गुरुजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मकरंद भाई पाटील, भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष जे.एन.पाटील, विधानसभा मतदार संघ प्रमुख महेंद्र भाई पटेल, शहाद्याचे ईश्वरभाई पाटील,
प्रकाशाचे विजू भाई पाटील, जिल्हा परिषदेच्या सभापती हेमलता शितोळे, जिल्हा परिषद सदस्य शांताराम पाटील यांच्यासह शहादा तालुक्यातील विविध गावाचे सरपंच उपसरपंच आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तारपाडा, खोंडामळी येथेही प्रचार फेरी
दरम्यान, महायुतीच्या तथा भारतीय जनता पार्टीचे उमेदवार महा संसद रत्न डॉक्टर हिनाताई गावित यांनी आज दिनांक 29 एप्रिल 2024 रोजी नवापूर आणि नंदुरबार तालुक्यातील गावांमधून झंझावाती दौरा करीत प्रचार फेरी काढली. सकाळच्या सत्रात त्यांनी नवापूर तालुक्यातील तारपाडा गावात भेट दिली. उमेदवार महा संसद रत्न डॉक्टर हिनाताई गावित यांच्या समवेत माजी आमदार शरद गावीत, जि.प महिला बालकल्याण सभापती संगिता गावीत, भाजपचे अल्पसंख्याक मोर्चाचे उपाध्यक्ष एजाज शेख यांनी या प्रचार फेरीचे नेतृत्व केले. गावातील प्रत्येक वसाहतीत प्रचार फेरी काढून त्यांनी मतदार बंधू भगिनींना आवाहन केले. नंतर कॉर्नर सभेत बोलताना उमेदवार डॉ. हिना गावित यांनी दहा वर्षाच्या कार्यकाळात केलेल्या विकास कामांची माहिती दिली तर माजी आमदार शरद गावित यांनी काँग्रेसच्या खोट्या प्रचाराला बळी पडू नका, असे आवाहन केले.
त्यानंतर दुपारच्या सत्रात उमेदवार डॉ. हिना गावित यांनी नंदुरबार तालुक्यातील खोंडामळी येथे तसेच खोडामळी गटातील काही गावांना प्रचार फेरी काढून संपर्क केला.
त्याप्रसंगी प्रमुख चौकात तसेच अनेक ठिकाणी गृहिणींनी उत्स्फूर्तपणे उमेदवार डॉक्टर हिनाताई गावित यांचे औक्षण केले तर काही ठिकाणी फुलांचा वर्षाव करून स्वागत करण्यात आले. गरीब कष्टकऱ्यांच्या वसाहतीमध्ये थांबून काही ठिकाणी डॉक्टर हिनाताई गावित यांनी संवाद केला. भारतीय जनता पार्टीचे तालुकाप्रमुख जे एन पाटील, माजी तालुकाप्रमुख दीपक पाटील, जिल्हा परिषद सदस्य शांताराम पाटील यांच्यासह भाजपा महायुतीचे पदधिकारी उपस्थित होते.