नंदुरबार l प्रतिनिधी
येथील एकलव्य विद्यालय व ज. ग. नटावदकर कनिष्ठ महाविद्यालयात २५ जानेवारी राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त पंचायत समिती नंदुरबार व एकलव्य विद्यालय नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते .
या कार्यक्रमाचे उद्घाटन एकलव्य विद्यालयाच्या प्राचार्या सौ. सुहासिनी नटावदकर यांनी केले. ही स्पर्धा माध्यमिक गट व उच्च माध्यमिक गट या दोन गटात घेण्यात आली होती. माध्यमिक गटाला लोकशाही बळकट करण्यासाठी युवकांचे योगदान व मोठ्या गटाला निवडणूक एक राष्ट्रीय सोहळा असे दोन विषय देण्यात आले होते.
माध्यमिक गटातून प्रथम क्रमांक प्राप्ती सुनील चौधरी , द्वितीय क्रमांक अनुष्का चेतन अहिरे व तृतीय क्रमांक गौरी संजय बैरागी या विद्यार्थ्यांनी मिळवला. तर उच्च माध्यमिक गटातून प्रथम क्रमांक आरती केशव पवार, द्वितीय क्रमांक प्रणव विकास जाधव आणि तृतीय क्रमांक सुजल इंद्रसिंग वळवी या विद्यार्थ्यांनी मिळवला आहे. या स्पर्धेचे परीक्षण नूतन कन्या महाविद्यालयाचे प्रा. बी. सी. पवार व श्रॉफ विद्यालयाच्या श्रीमती अंजली मराठे यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, प्रास्ताविक व आभार प्रदर्शन प्रा. सौ वर्षा घासकडबी यांनी केले. कार्यक्रमाचे नियोजन महाविद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक प्रा. एस. के. चौधरी, पर्यवेक्षक प्रा. एस. एफ. सोनार व महाविद्यालयाचे मराठी भाषा मंडळाचे प्रमुख डॉ. गिरीश पवार यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. देसले, श्रीमती मीनल वसावे यांनी परिश्रम घेतले. सर्व विजयी स्पर्धकांचे प्राचार्या सौ सुहासिनी नटावदकर यांनी अभिनंदन केले.