नंदुरबार l प्रतिनिधी
येथील गजमल तुळशीराम पाटील महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना एककाची स्वयंसेविका कु गायत्री भारत पाटील हिची 26 जानेवारी 2024 रोजी दिल्ली येथे राजपथावर होणाऱ्या प्रजासत्ताक पथसंचलनकरिता निवड झाली. संपूर्ण महाराष्ट्रातून फक्त 12 स्वयंसेविकांची या शिबिराकरीता निवड झाली असून यात गायत्रीचा दुसरा क्रमांक आहे.
महाविद्यालय, जिल्हा, विद्यापीठ, राज्य व पश्चिम विभाग या स्तरांवरील अनेक स्पर्धकांना मागे टाकत व आपल्या कला गुणांच्या आणि परेडच्या उत्कृष्ट सादरीकरणामुळे गायत्रीला हे यश प्राप्त झाले. संपूर्ण विद्यापीठ परिक्षेत्रातील तिन्ही जिल्ह्यांमधून फक्त गायत्रीचीच निवड झाली. नंदुरबार तालुका विधायक समितीचे चेअरमन चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते व संस्थेचे सरचिटणीस यशवंत पाटील संस्थेचे संचालक बी.के.पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत गायत्रीचा सत्कार करण्यात आला व तिला भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
महाविद्यालयाचे प्राचार्य तथा कबचौ उमविचे व्यवस्थापन परिषद सदस्य प्रा. डॉ. एम. जे. रघुवंशी व विद्यापीठाचे रासेयो संचालक प्रा डॉ.सचिन नांद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली गायत्रीने गेल्या चार महिन्यापासून या निवडीकरिता सराव केला. महाविद्यालयातील रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ.दिनेश देवरे, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ.उपेंद्र धगधगे, महिला कार्यक्रम अधिकारी प्रा. जयश्री नायिका, प्रा जितेंद्र पाटील यांनी गायत्रीच्या विविध स्तरांवरील शिबिरांकरीता परिश्रम घेतलेत. सोबतच राष्ट्रीय छात्र सेनेचे प्रमुख प्रा. डॉ. विजय चौधरी,प्रा. डॉ. माधव कदम, प्रतीक कदम यांनी गायत्रीच्या सरावाकरिता मदत केली.








