नंदुरबार l प्रतिनिधी
तापी-बुराई उपसा सिंचन योजनेच्या कामाला गती मिळावी व त्यासाठी नव्याने डीपीआर,प्रमा तयार करून नव्याने आर्थिक तरतूद व्हावी, यासाठी तापी बुराई जलसंघर्ष समितीने नागपूर येथे राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची भेट घेऊन येत्या हिवाळी अधिवेशनात या संदर्भात लक्षवेधी मांडण्यास निवेदन समितीचे दीपक पाटील,प्रफुल्ल पाटील,रविंद्र पाटील यांनी दिले.दरम्यान नागपूर येथील विधानभवन परिसरात धरणे आंदोलन करण्यात आले.
नंदुरबार तालुक्यातील पूर्व भाग हा नेहमीच अवर्षणप्रवण क्षेत्र म्हणून ओळखला जातो. यंदा देखील या भागात तीव्र दुष्काळाची छाया आहे. जर तापी-बुराई प्रकल्प झाला असता तर दुष्काळावर मात करता आली असती; परंतु अनेक वर्षापासून हा प्रकल्प रखडला असून त्याला लवकरात लवकर गती मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे.
त्याच अनुषंगाने गेल्या महिन्यात रनाळे येथे जलसंघर्ष समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे मोठे आंदोलन देखील उभारण्यात आले होते.त्या पार्श्वभूमीवर हिवाळी अधिवेशनात नागपूर येथे शेतकरी आंदोलनास बसले.या प्रकल्पास आर्थिक तरतूद करून रखडलेल्या कामाला सुरुवात झाली तर मोठा दिलासा एकूण तालुक्यातील २४ गावांना व शिंदखेडा तालुक्यातील ५० गावांना याचा लाभ मिळणार आहे. उर्वरित कामासाठी नव्याने डीपीआर तयार करून निधीची तरतूद करण्यासाठी मोठा कालावधी लागू शकतो. त्यामुळे रखडलेल्या कामासाठी आधी निधी मंजूर करावा, अशी अपेक्षा शेतकऱ्यांची आहे.








