नंदुरबार l प्रतिनिधी
पुढील वर्ष हे निवडणुकांचे आहे. येत्या काळात शिवदूत व बुथप्रमुखांचे मिळावे घेण्यात येणार असून, सर्व कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी ठामपणे एकत्र येऊन संघटनात्मक बांधणी करावी असे आवाहन शिवसेना शिंदे गटाचे सचिव भाऊसाहेब चौधरी यांनी केले. दर १५ दिवसांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः लोकसभा मतदारसंघ व जिल्हा निहाय पक्ष कमिट्यांच्या आढावा घेणार असल्याचे चौधरी यांनी सांगितले.
नंदुरबार येथे जिल्हा मध्यवर्ती शिवसेनेच्या कार्यालयात सोमवारी लोकसभा मतदार संघ क्षेत्र निहाय पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक घेण्यात आली. त्याप्रसंगी शिवसेनेचे सचिव भाऊसाहेब चौधरी यांनी मार्गदर्शन केले. बैठकीचे प्रास्ताविक जिल्हाप्रमुख ॲड.राम रघुवंशी यांनी केले. व्यासपीठावर संपर्कप्रमुख तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी, जिल्हाप्रमुख किरसिंग वसावे,धुळे ग्रामीणचे जिल्हाप्रमुख डॉ. तुळशीराम गावित,निरीक्षक राजेश पाटील, धुळे लोकसभा मतदारसंघाचे निरीक्षक प्रसाद ठोंबरे उपस्थित होते.
यावेळी चौधरी म्हणाले, निवडणुकीच्या तयारीच्या दृष्टिकोनातून आढावा बैठक अत्यंत महत्त्वाचे आहे. स्वतः मुख्यमंत्र्यांचे उत्तर महाराष्ट्राच्या संघटनात्मक बाबींकडे लक्ष आहे. विकास कामांसाठी फक्त आमदार, खासदारांना निधी देण्यात येत होता. आता गेल्या दीड दोन वर्षापासून विकास कामांसाठी नगरसेवक आणि पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना निधी देऊ शकतो हे मुख्यमंत्र्यांनी सिद्ध करून दाखवलेले आहे. बैठकीला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संघटनात्मक बांधणी मजबूत; माजी आ.चंद्रकांत रघुवंशी
जिल्ह्यातील दोन पंचायत समित्यांमध्ये सत्ता आहे. संबंधित सदस्यांच्या मतदारसंघात जिल्हा परिषदेच्या माध्यमातून काम होत नसल्याने शिवसेनेचे संपर्कप्रमुख चंद्रकांत रघुवंशी यांनी बैठकीत नाराजी व्यक्त केली.पक्ष संघटनात्मक बांधणी मजबूत करण्यासाठी सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी प्रयत्न करत असल्याचे रघुवंशी यांनी सांगितले.
रघुवंशींची मेहनत; विजयापर्यंत वाटचाल
धडगाव व अक्कलकुवा मतदारसंघात शिवसेना ( शिंदे गट) उमेदवार निवडू शकतो. आमश्या पाडवी यांना २०१४ मध्ये मिळालेली मतं व व त्यानंतर २०१९ मध्ये चंद्रकांत रघुवंशी व त्यांच्या टीमने घेतलेल्या मेहनतीमुळे त्यांनी विजयापर्यंत वाटचाल केली होती. परंतु, थोड्याफार फरकांनी जागा निसटल्याचे सचिव भाऊसाहेब चौधरी यांनी सांगितले.
सदस्यत्या नोंदणीसाठी क्यूआर स्कॅनर
चौधरी म्हणाले, शिवसेनेच्या वतीने सदस्य नोंदणीसाठी क्यूआर स्कॅनर देण्यात आला असून, त्या ठिकाणी फॉर्म भरून सदस्य झाल्याचे कार्ड मिळत.जिल्हा परिषद गट, पंचायत समिती गण निहाय ज्या ठिकाणी कार्यक्रम होतील. त्या ठिकाणी पदाधिकाऱ्यांनी डिजिटल स्टँडी बोर्ड बनऊन ठेवा. बोर्ड मधील क्यूआर स्कॅनरवरून स्कॅन केल्यानंतर सदस्यता नोंदणी केली जाईल








