नंदूरबार l प्रतिनिधी
नंदूरबार तालुक्याच्या पूर्व पट्ट्यात तापी बुराई उपसा सिंचन योजना २३ वर्षांपासून रखडली आहे. या प्रकल्पाला गती मिळाली नाही तर येत्या १२ सप्टेंबर रोजी तालुक्यातील वटबारे येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा रनाळेसह परिसरातील २४ गावांच्या ग्रामस्थांनी दिला.

निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खंदारे यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नंदूरबार तालुक्यातील पूर्व पट्टयात सिंचनासाठी तापी उपसा सिंचन प्रकल्प सन १९९९ पासून सुरू असून कामे अपूर्ण स्थितीत आहे. वेळोवेळी रास्ता रोको आंदोलन, लोकप्रतिनिधी व प्रशासनाला अनेक वेळा निवेदन देऊन २३ वर्षे पूर्ण होऊनही कोट्यवधींचा निधी खर्चूनही प्रकल्प पूर्ण न झाल्यामुळे नंदुरबार तालुक्यातील पूर्व भागातील शेतकऱ्यांची पाण्यासाठी दयनीय अवस्था झाली आहे.
आज जी भयंकर दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झाली आहे त्यास केवळ प्रशासन व लोकप्रतिनिधी जबाबदार असल्याचे निवेदनात नमूद केले आहे. हा प्रकल्प पूर्ण झाला असता तर अनेक गावातील शेतकऱ्यांचा पाण्याचा प्रश्न सुटला असता.. त्यामुळे आज कदाचित शेतकऱ्यांना दुष्काळाची झळ पोहोचली नसती. त्यामुळे- मागणीची दखल न घेतल्यास तापी बुराई पाइपलाइन जवळ १२ सप्टेंबर रोजी वडबारे रस्त्यावर रास्ता रोको आंदोलनाचा इशारा दिला आहे.








