नंदुरबार l प्रतिनिधी
महाराष्ट्र शासन कामागार विभाग यांचे अंतर्गम महाराष्ट्र राज्य इमारत बांधकाम व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ, मुंबई यांच्यातर्फे नंदुरबार जिल्हयातील बांधकाम कामगारांसाठी अत्यावश्यक व सुरक्षा संचाचे वाटप जिल्ह्याचे खासदार डॉ.हिना गावीत व जिल्हा परीषदेच्या अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावीत यांच्या हस्ते करण्यात आले.
खा.डॉ.हीना गावित यांनी नंदुरबार जिल्हयातील इमारत बांधकाम कामगारांना मिळणाऱ्या संचातील वस्तुंचा योग्य पध्दतीने वापर करून आपल्याला कोणत्याही प्रकारची इजा होवू नये, सुरक्षा संचातील वस्तुचा वापर नियमीत करण्याचा सुचना दिल्या. तसेच घरकुल योजना, अपघात योजना, कामगारांच्या पाल्यांना मिळणाऱ्या शिष्यवृत्ती तसेच इतर योजनांचा आढावा घेतला व कामगारांना माहिती दिली. नंदुरबार जिल्हा परीषदेच्या अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावीत यांनी कामगारांना मिळणाऱ्या रेशनच्या सुविधा तसेच घरकुल योजना, आरोग्य योजनांची माहिती करून दिली.
व्यासपीठावर नंदुरबार नगर परीषदेचे माजी नगरसेवक संतोष वसईकर, लक्ष्मण माळी, मंडळाचे कार्यालय प्रमुख संजय कोकणी हे उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी केंद्र चालक पी.बी.पाटील, भरत गवळे, सागर पाटील, बीपीन पाटील, प्रितम पाटील यांनी परीश्रम घेतले. कार्यक्रमास जिल्हयातील कामगार मोठया संख्येने उपस्थित होते.








