नंदुरबार l प्रतिनिधी
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत “शासन आपल्या दारी” अभियानांतर्गत ऊसतोड कामगारांना ओळखपत्र वाटप करण्यात येणार असल्याचे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण देविदास नांदगावकर, यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
राज्यातील ऊसतोड कामगारांचे व पर्यायाने त्यांच्या कुटूंबियांचे जीवन अस्थिर व अत्यंत हलाखीचे असल्यामुळे त्यांचे जीवन सुखकारक करून त्यांचे राहणीमान उंचावून आयुष्य स्थिर व सुरक्षित करण्यासाठी ऊस तोडणी व्यवसायातील ऊसतोड कामगारांना विविध कल्याणकारी योजनांचा लाभ देण्यासाठी शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने ओळखपत्र प्रदान करणेसंदर्भात नियमावली निश्चित केली आहे.
त्या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व ऊसतोड कामगारांना आवाहन करणेत येते की, जे ऊसतोड कामगार मागील 3 वर्षे किंवा जास्त कालावधीपासुन ऊसतोडणीचे काम करत आहेत व जे इतर नियमांची पूर्तता करत आहेत त्यांनी आपल्या ग्रामपंचायत कार्यालयाशी संपर्क करून नोंदणी करून विहित नमुन्यात ओळखपत्र प्राप्त करून घ्यावे. जेणेकरून भविष्यात सदर कामगारांकरीता शासनाच्या येणाऱ्या विविध योजनांचा लाभ घेणे सोईचे होईल, असे आवाहनही श्री. नांदगावकर, यांनी केले आहे.








