नवापूर l प्रतिनिधी
नवापूर शहरातील काळंबा येथे शेतात तसेच पिंपळनेर रोडवर फिरणाऱ्या बिबटयाचा कायमस्वरुपी बंदोबस्त करावा यासाठी काळंबा ग्रामस्थांनी थेट वन विभागाचे कार्यालय गाठले व अधिकाऱ्यांसमोर गाऱ्हाने मांडले यावेळी वन विभागाचे अधिकारी यांनी नियमानुसारच कारवाई करणार असल्याचे सांगितले.
जंगलातून ऊसाच्या शेतात अधिवास केलेला बिबट्या आता ऊसकाढणीनंतर आमराईत जागा शोधू लागला आहे. याची प्रचिती नवापूर तालुक्यातील काळंबा आला.शिवारातील फिरोज भाई यांच्या आमराईत आंब्यांची देखभाल करणारे मजूर यांना बिबट्या व त्याच्या पिल्लांनी दर्शन दिल्याने ते भयभीत होऊन सैरावैरा धावत सुटले कसाबसा आपला जीव वाचवला.
नवापूर शहरालगतच्या काळंबा गावातील रहिवासी परिसरातील शेतकरी यांनी वन विभागाला 2019- 20 या कालावधीपासून वारंवार निवेदने देऊन काळंबा शिवारात बिबटयाचा वावर आहे व या बिबट्याने पाळीव बोकड, बकरी, कुत्रे, कोंबडी, गाय व मांजर यांची शिकार केलेली आहे. याबाबत वन विभागाच्या अधिकाऱ्यांना कळविले होते. परंतु, वन विभागाने काहीही कार्यवाही केलेली नाही.असा आरोप करण्यात आला आहे.
आता सदर मादी जातीचा बिबट्यासोबत त्याचे पिल्लु देखील फिरतांना दिसत आहे. त्यामुळे काळंबा ग्रामस्थ परिसरातील शेतकरी यांच्यात भयभितीचे वातावरण निर्माण झालेले असून काही नागरिकांनी शेती काम बंद केले आहे.
तसेच शुक्रवार दि. १९ मे रोजी फिरोज भाई यांच्या आमराईत काळंबा गावातील रमेश कालीदास गावीत हे त्यांच्या शेतात काम करीत असतांना सायंकाळी त्यांना बिबट्या व त्याचे पिल्लू दिसले व त्यामुळे रमेश गावीत हे भयभीत झाले व त्यांनी गावात ही बातमी कळविली. तेंव्हापासून गावकरी घरातून बाहेर निघावे की नाही.
शेतात जावे की नाही असा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला आहे .कारण हा बिबट्या दोन ते तीन वर्षापासून नेहमीच गांवकऱ्यांना दिसत असतो व गांवकरी त्यापासून जीव वाचवून पळत असतात.
याबाबत वन विभागाच्या अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना याबाबत माहिती दिली असून निवेदन देखील देण्यात आले आहे. यावर वन विभागाने ठोस उपाययोजना करावी अशी मागणी करण्यात आली आहे नागरिकांनी वनविभागाच्या कार्यप्रणालीवर देखील नाराजी व्यक्त केली.








