नंदुरबार । प्रतिनिधी
कैदी सुद्धा समाजाचा एक घटक असून, या दुर्लक्षित घटकाला आरोग्य सुविधा मिळाव्यात, आरोग्याबाबत कैद्यांमध्ये जागृती व्हावी या उद्देशाने येथील जिल्हा कारागृहात कैद्यांसाठी आरोग्य तपासणी शिबिर राबविण्यात आले. यावेळी सुमारे १०० कैद्यांची आरोग्य तपासणी होवून औषध वाटप करण्यात आले.
येथील विद्यासरोज हॉस्पीटल, एचएम मेमोरियल लॅब तसेच अंकुर सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने कैद्यांसाठी आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. यावेळी ईसीजी, ब्लडप्रेशर, शुगर आदी तपासणी होवून औषध देण्यात आले. तुरंग प्रशासनाच्या नियमानुसार पुढील उपचार केले जाणार आहेत. आरोग्याबाबत घ्यावयाची काळजी याबाबत मान्यवरांनी कैद्यांना मार्गदर्शन केले. यावेळी वकील संघाच्या ऍड.सीमा खत्री, ऍड.शुभांगी चौधरी, ऍड.हेमंत महाजन, विद्यासरोज हॉस्पीटलचे डॉ.स्वप्निल महाजन, डॉ.उर्मिला रमनानी, डॉ.निकिता पाटील, जिल्हा कारागृह अधिक्षक राजेंद्र देशमुख, एचएम मेमोरियल लॅबचे संचालक कैलास मराठे तसेच जिल्हा कारागृहातील कर्मचारी उपस्थित होते.