नंदूरबार | प्रतिनिधी
विधिमंडळाच्या अधिवेशन काळात व त्या नंतर सामान्य जनतेचे लोकोपयोगी कार्य पार पाडले जावे व लोक प्रतिनिधींना विधिमंडळात प्रश्न मांडण्यासाठी विविध संसदीय आयुधांचा वापर करता यावा यासाठी विधान परिषदेच्या नवीन सदस्यांचे एक दिवसीय प्रशिक्षण विधान भवनात संपन्न झाले.या प्रशिक्षणाचा लाभ विधान परिषदेचे आ. आमश्या पाडवी यांनी घेतला.
विधी मंडळाचे अधिवेशन कालावधीतील कामकाज तसेच जन सामान्यांची दैनंदिन कामे वेळेवर पूर्ण करता यावीत या करिता सभागृहाचे नव्याने सदस्य झालेल्यां सदस्यांना आवश्यक प्रशिक्षण मिळावे अशी मागणी आ. आमश्या पाडवी यांनी विधान परिषदेच्या उप सभापती डॉ.निलम गोऱ्हे यांच्याकडे केली होती त्या अनुषंगाने उप सभापती डॉ.निलम गोऱ्हे यांनी एक दिवसाचे प्रशिक्षण मुंबई विधान भवनात आयोजित केले होते.
या प्रशिक्षणात विधान मंडळाचे सेवानिवृत्त प्रधान सचिव डॉ. अनंत कळसे, सह सचिव डॉ. विलास आठवले, सेवानिवृत्त मुख्य माहिती आयुक्त विलास पाटील यांनी विधान परिषदेच्या सदस्यांना प्रशिक्षण दिले. यात सदस्यांना संसदीय आयुधांची माहिती,त्यांचा वापर, विधीमंडळ समितीची कार्यप्रणाली व त्यांना प्राप्त अधिकार तसेच शासकीय विधेयके यांची विस्तृत माहिती सोप्या शब्दात दिली.
विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, आ.अनिल परब, आ. विक्रम काळे यांनी त्यांचे अनुभव व सभागृहात सध्या होत असलेल्या प्रश्नांवरील चर्चा, लक्षवेधी सूचनांची व्याप्ती त्यांची कालमर्यादा याबाबत सांगितले. सदर प्रशिक्षण वि.स.पागे संसदीय प्रशिक्षण केंद्राच्या वतीने घेण्यात आले. यावेळी विधान परिषदेचे अनेक सदस्यांनी प्रशिक्षणात उपस्थित राहुन प्रशिक्षणाचा लाभ घेतला.
सार्वजनिक जीवनात समाजासाठी अनेक आंदोलने, रस्ता रोको, न्यायिक हक्कासाठी रस्त्यावर उतरुन आम्ही नेहमीच काम करीत असतो परंतु एक लोकप्रतिनिधी या नात्याने सभागृहात एखादा विषय मांडतांना कायद्याच्या चौकटीत राहून संसदीय शब्दांचा वापर करून प्रभावी शैलीने उपलब्ध आयुधांचा वापर करीत प्रश्न कसे मांडावेत व कार्य सिद्धी कशी तडीस न्यावी हे आम्ही प्रशिक्षणात पुनः एकदा शिकलो. उप सभापती निलम गोऱ्हे यांनी हा प्रशिक्षण कार्यक्रम घडवून आणत आमच्यातला आत्मविश्वास वाढवला आहे. आणि हा आत्मविश्वास विधानपरिषदेच्या सभागृहातील एकमेव लोकप्रतिनिधी या नात्याने काम करतांना कामी येणार आहे.
आ. आमश्या पाडवी
आमदार विधान परिषद








