नंदुरबार l प्रतिनिधी
श्री.छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त डॉ. विक्रांत मोरे मित्रमंडळातर्फे भव्य ऐतिहासिक किल्लेनिर्मिती व रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.

या स्पर्धेत धुळे, जळगाव व नंदुरबार जिल्ह्यातील स्पर्धकांनी मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला. ऐतिहासिक रांगोळी स्पर्धेत ३२५ स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. त्यात स्पर्धकांनी छत्रपती शिवरायांच्या कार्य आणि कर्तुत्वाचे प्रतिबिंब साकार केले. तसेच किल्ले निर्मितीसाठी ६५ स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. स्पर्धकांनी शिवकालीन विविध गड, किल्ल्यांच्या प्रतिकृती सादर केल्या. सदर स्पर्धेत महिला स्पर्धकांचा सहभाग विशेष उल्लेखनीय दिसून आला.
स्पर्धेचे आयोजन डॉ. विक्रांत मोरे मित्र मंडळातर्फे जिजामाता महाविद्यालय व सेंट मदर टेरेसा इंग्लिश मीडियम स्कूल नंदुरबार येथे करण्यात आले होते. याप्रसंगी नंदुरबार शहरातील वेगवेगळ्या शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक व पालक तसेच शहरातील प्रतिष्ठित, नामांकित नागरिकांनी किल्लेनिर्मिती व रांगोळी प्रदर्शनास उत्स्फूर्तपणे हजेरी लावून डॉ. विक्रांत मोरे यांनी राबविलेल्या उपक्रमाचे भरभरून कौतुक केले. सदर स्पर्धेचे परीक्षक म्हणून डॉ. सर्जेराव भामरे, डॉ. एन. डी. भामरे तसेच चित्रकला शिक्षक चंद्रशेखर चौधरी, एस. एस. पाडवी, चिदानंद तांबोळी, प्रदीप देसले,चतुर्भुज शिंदे, देवेंद्र कुलकर्णी इत्यादी मान्यवरांनी काम पाहिले.








