नंदुरबार l प्रतिनिधी
समाजासाठी काम करणाऱ्या व्यक्तीच्या मागे समाजातील प्रत्येक व्यक्तीने खंबीरपणे पाठीशी उभे राहावे. समाजाच्या मंगल कार्यालयाच्या राहिलेल्या कामासाठी आपण सदैव मदत करण्यासाठी कटिबद्ध राहू असे प्रतिपादन माजी आ चंद्रकांत रघुवंशी यांनी आज येथे केले आहे.
येथील ज्ञानदीप सोसायटीमध्ये बनविण्यात आलेल्या मराठा पाटील समाज मंडळाचे शाहीर हरिभाऊ मराठा पाटील नूतन मंगल कार्यालयाचे नामकरण व उद्घाटन माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटन समारंभाचे अध्यक्षस्थानी मंडळाचे अध्यक्ष सेवानिवृत्त प्राचार्य बी.एस.पाटील हे होते. माजी नगराध्यक्षा रत्ना रघुवंशी, उद्योगपती डॉ.रवींद्र चौधरी, देणगीदार श्रीमती उषाबाई हरिभाऊ पाटील, सेवानिवृत्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. जी. एन.मराठे, हृदयरोग तज्ञ डॉ.दीपक अंधारे, सचिव यशवंत पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. चारुदत्त शिंदे, विश्वास पाटील, शालिग्राम पाटील, धुळे भूविकास बँकेचे माजी अध्यक्ष दिनकर पाटील, भास्कर पाटील, युवराज पाटील, माजी नगरसेवक कैलास पाटील, गो.पी. लांडगे, प्रा. व्ही.एम. अहिरराव, प्रा. आर.बी.पाटील, मधुकर पाटील, आर. डी.मोरे, निंबाजीराव बागुल, राजेंद्र बागुल यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी मंगल कार्यालयाच्या इमारतीचे फीत कापून व कोन शिलावर अनावरण माजी आ. चंद्रकांत रघुवंशी व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. राष्ट्र पुरुषांसह शाहीर हरिभाऊ पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन व कार्यक्रमाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी श्री.रघुवंशी पुढे म्हणाले आपल्या समाजाचे मंगल कार्यालय अनेक दिवसांपासून नव्हते त्यासाठी ज्येष्ठ मंडळींनी पुढाकार घेऊन मंगल कार्यालय पूर्ण केले. समाजाच्या या चांगल्या कामासाठी आपण सगळ्यांनी केलेली मदत ही मोलाची आहे त्यातच शाहीर हरिभाऊ पाटील यांच्या नावाने त्यांच्या पत्नी उषाबाई पाटील यांनी दिलेली देणगी ही मोलाची आहे.
आपल्या समाजासाठी व मंगल कार्यालयासाठी कुठलीही गरज किंवा मदत लागल्यास ती देण्यास मी सदैव तयार राहील असे श्री.रघुवंशी यांनी शेवटी सांगितले. यावेळी उद्योगपती डॉ. रवींद्र चौधरी यांनी समाजाच्या या कार्याला शुभेच्छा दिल्या समाजातील पदाधिकारी व नागरिकांचे कौतुक केले. सेवानिवृत्त प्राचार्य बी.एस.पाटील यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात मंडळामार्फत तयार करण्यात आलेल्या वास्तूसाठी कशा पद्धतीने अडचणी आल्या व त्या सोडविल्या गेल्या त्या संदर्भात तसेच समाजकार्यासाठी मदत करणाऱ्या प्रत्येक नागरिकाचे त्यांनी आभार मानले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक यशवंत पाटील यांनी केले सूत्रसंचालन जगदीश देवपूरकर व प्रा. डॉ. माधव कदम तर आभार प्रदर्शन उमेश भदाणे यांनी केले. कार्यक्रमाला समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कार्यकारीणी सदस्य , सक्रीय सभासद तसेच कॉलनीतल्या सभासदांनी सहकार्य केले.








