नंदुरबार l प्रतिनिधी
भारतीय डाक विभागातर्फे प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या पात्र लाभार्थ्यांची, आयपीपीबीमार्फत आपल्या गावातील नजीकच्या पोस्ट कार्यालयात खाते उघडण्यात येत असल्याची माहिती धुळे विभाग, प्रवर अधिक्षक डाकघर, प्रताप सोनवणे यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.
डाक विभागामार्फत ज्या नागरीकांचे आधारकार्डला मोबाईल क्रमांक लिंक नसेल त्यांचेही आयपीपीबीच्या सीईएलसी युजर मार्फत (जर आपल्या गावातील नजीकच्या पोस्ट ऑफिस मध्ये सीईएलसी युजर असेल तर त्यांच्या मार्फत) आधार कार्डला मोबाईल क्रमांक लिंक करण्यात येईल. तसेच आयपीपीबीमार्फत पीएम किसान योजनेचा लाभ घेण्यासोबतच आयपीपीबी खातेधारकास रुपये 396 तसेच 399 रुपयात अपघाती विम्याचे दहा लाखांचे संरक्षण सुद्धा घेऊ शकतील.
यासोबतच खातेधारक आयपीपीबीचे मोबाईलवर ॲप डाऊनलोड करून लाईट बिल, मोबाईल रिचार्ज, डीटीच रिचार्ज, पोस्ट ऑफिसच्या बचत खाते, आरडी, पीपीएफ, सुकन्या समृद्धी योजना खाते, ग्रामीण डाक जीवन विमा इत्यादीचे हप्ते घरबसल्या जमा करू शकतात, तसेच खात्यातील रक्कम दुसऱ्या बँक खात्यात ही पैसे हस्तांतरण करू शकणार आहे.
तरी सर्व प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या लाभार्थ्यांनी आपल्या गावातील नजीकच्या पोस्ट ऑफिसमध्ये, आधार कार्ड लिंक करून आयपीपीबीची खाती उघडावीत असे आवाहन श्री. सोनवणे यांनी केले आहे.








