नंदुरबार | प्रतिनिधी
शहादा येथुन स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोटार सायकल चोरी करणार्या एकास अटक केली असुन त्याच्या ताब्यातुन १ लाख ३ हजार रुपये किमतीच्या ४ मोटार सायकली हस्तगत करुन ३ मोटार सायकल चोरीचे गुन्हे उघड केले आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी कि, नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील यांनी गुन्हे बैठकीत मोटार सायकल चोरीच्या गुन्ह्यांचा गुन्हे आढावा घेतला असता, नंदुरबार जिल्ह्यातील विविध पोलीस ठाणे हद्दीत मोटर सायकल चोरीचे गुन्हे दाखल आहेत. तसेच पोलीसांसमोर चोरट्यांना जेरबंद करुन घडलेले गुन्हे उघडकिस आणणे हे मोठे आव्हान होते. त्याअनुषंगाने मोटर सायकल चोरीच्या गुन्ह्यांचा गांभीर्याने तपास करुन मोटर सायकल चोरीचे गुन्ह्यातील सक्रीय गुन्हेगारांवर कारवाई करणेबाबत नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी निर्देश गुन्हे बैठकीत सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकार्यांना दिले.
वरिष्ठांच्या सुचना व मार्गदर्शनानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर यांनी नंदुरबार जिल्ह्यातील विविध पोलीस ठाणे अंतर्गत चोरी झालेल्या मोटार सायकल चोरीच्या पध्द्तीचा अभ्यास करुन वारंवार चोरी होणारे ठिकाण, वेळ, दिवस किंवा चोरी होणारी विशेष कंपनीची मोटार सायकल यांची इत्यंभूत माहिती घेवुन रेकॉर्डवरील, जेलमधुन सुटुन आलेल्या मोटार सायकल चोरीच्या गुन्ह्यातील गुन्हेगारांवर तसेच ज्या ठिकाणावरुन जास्त प्रमाणात मोटर सायकल चोरीस जातात त्याठिकाणी पाळत ठेवुन होते. तसेच आपले बातमीदारांमार्फत माहिती घेवुन मोटर सायकल चोरांचा शोध घेत होते.
६ जानेवारी रोजी पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, शहादा शहरातील जुनी भाजी मंडी परिसरात एक इसम कागदपत्र नसलेले मोटर सायकल कमी किंमतीत विकत आहेत अशी बातमी मिळाल्याने सदरची माहिती त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर यांना सांगितली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर यांनी तात्काळ स्थानिक गुन्हे शाखेचे १ पथक करुन त्यांना योग्य ते नियोजन करुन सापळा लावण्याचे आदेश देवून पुढील योग्य ती कायदेशीर कारवाई करणेबाबत सुचना दिल्या.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तात्काळ शहादा शहरातील जुनी भाजी मंडी परीसरात जावून खात्री केली असता एका टपरीजवळ एक इसम एका विना नंबर प्लेट असलेल्या मोटार सायकलसह दिसून संशयास्पद हालचाली करतांना दिसून आला. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक त्यांच्याकडे जात असतांना संशयीत इसमाने तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला, परंतु स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्याचा पाठलाग करुन अनिल नरपत वसावे रा. सरी पो. मोलगी ता. अक्कलकुवा यास अटक करून त्याच्या ताब्यात असलेल्या मोटर सायकल बाबत विचारपुस करता तो उडवा उडवीची उत्तरे देवु लागला. म्हणुन त्यास विश्वासात घेवुन अधिक विचारपुस केली असता त्याने सांगितले की, सदरची मोटार सायकल त्याने सुमारे २ ते ३ दिवसापूर्वी शहादा शहरातील राजपाल वाईन शॉपच्या मागे एका घरासमोरुन चोरी केल्याचे सांगितले. त्याबाबत शहादा पोलीस ठाण्याचे गुन्हे अभिलेखाची पडताळणी केली असता सदर मोटार सायकलबाबत शहादा पोलीस ठाण्यात भा.द.वि. कलम ३७९ प्रमाणे गुन्हा नोंद आहे.
ताब्यात घेण्यात आलेला संशयीत आरोपी अनिल नरपत वसावे याच्याविरुध्द् यापूर्वी देखील मालमत्तेविरुध्दचे गुन्हे असल्याचे समजून आले. म्हणून त्यास अधीक विश्वासात घेवून विचारपूस केली असता, त्याने धडगांव, परिसरातून आणखी तीन मोटार सायकल चोरलेल्या असून चोरी केलेल्या मोटार सायकली शहादा शहरातील नवीन बस स्थानकाच्या मागे काटेरी झुडपांमध्ये लपवून ठेवलेल्या आहेत.याबाबत सविस्तर माहिती दिल्याने तेथून ८८ हजार रुपये किमतीच्या ३ असा मोटार सायकली ताब्यात घेण्यात आलेल्या आहेत. त्याबाबत धडगांव पोलीस ठाणे, मोलगी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. ताब्यात घेण्यात आलेल्या संशयीत आरोपीकडून एकुण १ लाख ३ हजार रुपये किमतीच्या ४ मोटार सायकली हस्तगत करुन ३ मोटार सायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आलेले आहेत. तसेच ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीतांकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील, अपर पोलीस अधिक्षक निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर, सहा. पोलीस निरीक्षक संदीप पाटील, पोलीस हवालदार सजन वाघ, मुकेश तावडे, पोलीस नाईक पुरुषोत्तम सोनार, मोहन ढमढेरे, पोलीस अंमलदार अभिमन्यु गावीत, दिपक न्हावी यांच्या पथकाने केली आहे.