म्हसावद l प्रतिनिधी
येळकोट येळकोट जय मल्हार च्या जय घोषात, हजारो भाविकांच्या साक्षीने बारा गाडी लांगड ओढून काथर्दे दिगर (ता.शहादा) येथील खंडेराव महाराज यात्रोत्सवाला जल्लोषात व भक्तीमय वातावरणात प्रारंभ झाला.
पौष शुध्द पौर्णिमेला काथर्दे दिगर (ता.शहादा) येथील खंडेराव महाराज यात्रोत्सवाला शुक्रवारी विविध पुजा अर्चा करून सुरवात झाली.तत्पूर्वी रविवारी खंडेराव महाराज मंदिरात तळीभरून गोंधळ, जागर करण्यात आला. तर आदल्या दिवशी गुरूवारी गाव तमाशा सादरीकरण झाले.तब्बल आठवडाभर चालणारा या यात्रोत्सवानिमित्त खेळणी,भांडी,शेती उपयोगी अवजारे,उपहार गृह,पाळणे, मनोरंजनाची साधने आदींसह लहान मोठे शेकडो व्यवसायीकांनी दुकाने थाटली आहेत.
सोयीसुविधा
यानिमित्त ग्रामपंचायत प्रशासन व जय मल्हार ट्रस्टतर्फे रस्त्ये, पाणी,पथदिवे,साफसफाई ची कामे करण्यात आली आहे. महिला व पुरुषांना दर्शनासाठी स्वतंत्र बॅरेकेटींग करण्यात आले आहे.सरपंच तथा जय मल्हार ट्रस्टचे अध्यक्ष गुलाबसिंग गिरासे,उपाध्यक्ष निंबा गिरासे,सचिव भिमसिंग गिरासे आदी.सह ग्रामस्थ भाविकांच्या सोयीसुविधांसाठी प्रयत्नशिल आहेत. तर प्रभारी पोलिस निरीक्षक राजन मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली वाढीव पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे.कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी विशेष लक्ष ठेवले जात आहे.
लांगड ओढली
खंडेराव महाराज यात्रोत्सवानिमित्त शुक्रवारी लांगड ओरडण्याचा कार्यक्रम लक्षवेधी ठरला.खंडेराव महाराजांचे वारे संचारलेले भगत रघुनाथ मिस्तरी कानळदे (ता.नंदूरबार) यांनी बारा गाड्या लांगड कमरेला बांधून ती सुमारे अडीच शे.फुटांपर्यंत ओढून नेली.शेकडो भाविक या बारा गाड्या लांगडीवर बसले होते. याप्रसंगी येळकोट येळकोट जय मल्हार च्या जय घोष,भंडारा ची प्रचंड उधळण,करित भाविकांनी मोठ्या श्रध्देने हा सोहळा नजरेत व आपल्या मोबाईल मध्ये कैद केला.त्यानंतर खंडेराव महाराज,महादेव व मारूतीचे मोठ्या भक्ती भावात दर्शन घेतले.या यात्रोत्सवानिमित्त पंचक्रोशीतील हजारो भाविकांनी हजेरी लावली.








