नंदुरबार | प्रतिनिधी
स्पर्धेत हारणे-जिंकणे इतकेच महत्वाचे नाही. अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. स्पर्धेमध्ये नेहमी बेस्ट देणे महत्वाचे आहे, असे प्रतिपादन प्राचार्या नुतनवर्षा वळवी यांनी केले. ते येथील शालेय जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होत्या.
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व ऑल नंदुरबार जिल्हा कराटे असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने एस.ए.मिशन हायस्कूल येथे शालेय जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेचे उद्घाटन नॅशनल सिक्युरिटी गार्ड कमांडे भटू बाविस्कर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका नूतनवर्षा वळवी, डॉ.सुनिता अहिरे, नरेंद्र माळी, विवेक पालीकर, पदमेश माळी आदी उपस्थित होते. स्पर्धेत १४ वर्षा आतील मुली गटात खुशी प्रफुल पाटील, जान्हवी महेंद्र पवार, १७ वर्षा आतील गटात वैष्णवी आहेर, रीना बैसाने, मयुरी पिंगळे, नेहा बोराणे, स्नेहल पवार यांनी यश संपादन केले.
विजयी स्पर्धकांची दि.८ ते १० जानेवारी २०२३ दरम्यान मिनाताई ठाकरे संकुल, नाशिक येथे होणार्या विभागीय कराटे स्पर्धेसाठी निवड झालेली आहे. स्पर्धेत जिल्ह्यातील जवळ पास १५ शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. यावेळी पंच म्हणून योगिता बैसाणे, प्रतिक खंडेलवाल, पवन सर, कॉर्नर रेफ्री म्हणून अमित पाडवी, याकूब मोहम्मद, विशाल सोनवणे, गणेश गोसावी तर टेबल जज म्हणून मोहित सोनवणे, लिना पंडीत, दिपीका रामोळे यांनी काम पाहिले. स्पर्धेचे निरीक्षण असोसिएशनचे अध्यक्ष संतोष मराठे यांनी केले. सूत्रसंचालन व आभार सचिव गणेश मराठे यांनी मानले.








