नंदुरबार l प्रतिनिधी
शासनाकडून पाच हजार रुपये मोफत मिळणार असल्याचे आमिष दाखवून महिलांच्या अज्ञानाचा फायदा घेवून त्यांच्या नावावर कर्ज घेत कर्जाची रक्कम न देता तीन कोटी ७२ लाख २ हजार ९१४ रुपयांत कर्जदार महिलांची व मायक्रोफिन कंपनीची फसवणूक केल्याप्रकरणी नऊ संशयितांविरुद्ध नंदूरबार शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नंदुरबार येथील अविनाश जगदीश भालेराव,शिलाबाई सोनवणे रा.ठाणेपाडा,सुशिला पाडवी रा.नांदरखेडा , हिराबाई चौरे रा.टाकलीपाडा, कल्पना वळवी रा.वासदरे ,नामदेव वळवी रा.नळवे,गुजरभवाली ,भुरीबाई भिल रा.चौपाळे ,रुकसान शेख रा.नंदुरबार व जाहेंदा रा.नंदुरबार यांनी संगनमत अशिक्षित व गरीब महिलांना शासनाकडून पाच हजार रुपये मोफत मिळणार असल्याचे अमिष दाखवून महिलांकडून कागदपत्रे घेवून त्यांच्या नावावर कर्ज मंजूर करुन घेवून कर्जदारांना कर्जाची पूर्ण रक्कम न देता उर्वरित रक्कम स्वत:कडे ठेवून कर्जदार महिलांची व मायक्रोफिन लिमिटेड कंपनीची तब्बल तीन कोटी ७२ लाख २ हजार ९१४ रुपयांत फसवणूक करण्यात आली आहे.
याप्रकरणी कंपनीचे झोनल मॅनेजर अंकुशसिंग कृष्ण कुमारसिंग गहलोद यांच्या फिर्यादीवरुन नंदुरबार शहर पोलीसांत भादंवि कलम ४२०,४०६,३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.घटनास्थळी पोलीस उपविभागीय अधिकरी सचिन हिरे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर,सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रतापसिंग मोहिते यांनी १९ डिसेंबर रोजी भेट दिली आहे.याप्रकरणी पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रतापसिंग मोहिते करत आहेत.








