नंदूरबार l प्रतिनिधी
ग्रामपंचायत निवडणुकी नंतर बोरद येथे झालेल्या पहिल्याच ग्रामसभेत पेसा कायद्याचा अध्यक्ष नेमण्यावरून वाद झाला होता. ग्रामसभेत माजी सदस्या इंदिराबाई मंगलसिंग चव्हाण यांना मारहाण केल्याची घटना घडली होती. या प्रकरणी तळोदा पोलीस ठाण्यात उपसभापती सरपंच, उपसरपंच व सदस्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर सत्ताधारी गटाकडून माजी जि.प. सदस्या व ग्रामपंचायत सदस्य व इतर दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तळोदा तालुक्यातील बोरद येथे निवडणुकीनंतर ग्रामसेवक यांनी पहिलीच ग्रामसभा आयोजित केली होती. या ग्रामसभेत पेसा कायद्याचा अध्यक्ष निवडीवरून वाद चिघडला होता व या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले होते. त्यामुळे माजी जि. प. सदस्या इंदिराबाई चव्हाण यांनी सत्ताधारी पक्षातील सरपंच उपसरपंच व सदस्य विरोधात गुन्हा दाखल केला होता त्यानंतर १ डिसेंबर २०२२ रोजी निर्मलाबाई बादशहा पाडवी यांनी अनिल प्रेमसिंग राजपूत, इंदिराबाई मंगलसिंग चव्हाण,दयानंद मंगलसिंग चव्हाण,जयदीप दयानंद चव्हाण.राहणार सर्व बोरद यांच्या विरोधात फिर्याद दाखल केली आहे.
फिर्यादीत म्हटले आहे की ३० नोव्हेंबर २०२२ रोजी सकाळी ९ वाजता बोरद ग्रामपंचायतीत ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी निर्मलाबाई बादशहा पाडवी यांची चुलत बहीण गायत्री रतीलाल भिलाव हिचा मागून येऊन ग्रामपंचायत सदस्य अनिल प्रेमसिंग राजपूत याने मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. हे निर्मलाबाई पाडवी यांच्या लक्षात आले व त्यांनी अनिल राजपूत यांना त्याचा जाब विचारला असता. त्याचा राग येऊन गावातील नागरिक इंदिराबाई मंगलसिंग चव्हाण ह्या मध्यस्थी झाल्या व निर्मलाबाई पाडवी यांच्या अंगावर धावून आल्या व त्यांनी डाव्या कानशिलात त्यांनी थाप मारली तसेच दयानंद मंगलसिंग चव्हाण यांनी फिर्यादीला हाताने ढकलून दिले व शिवीगाळ करत जीवे ठार मारण्याची धमकी दिली.
म्हणून त्यांच्या विरोधात निर्मला पाडवी यांनी तळोदा पोलीस स्टेशनला फिर्याद दिली असून त्यासंदर्भात अनिल प्रेमसिंग राजपूत, इंदिराबाई मंगलसिंग चव्हाण,दयानंद मंगलसिंग चव्हाण, जयदीप दयानंद चव्हाण सर्व रा.बोरद यांच्या विरोधात विनयभंग करणे व ग्रामसभा उधळून लावणे यासंदर्भात भा. द.वि. कलम ३५४,३२३,५०४,५०६,३४ अंतर्गत तळोदा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात पुढील तपास पोलीस निरीक्षक पंडित सोनवणे यांचा आदेशानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक अमितकुमार बागूल हे करत आहेत.