नंदुरबार | प्रतिनिधी
छत्रपती शिवाजी महाराज अनेक पिढ्यांपर्यत आदर्श आहेत व राहतील. छत्रपती शिवरायांची तुलना देशभरात कोणाशीच होवू शकत नाही.यामुळे शिवरायांचा आदर्श देशातील प्रत्येकाने राखला पाहिजे,राज्यपाल कोणत्या संदर्भात बोलले हे मला माहित नाही असे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.
नंदुरबार येथील भाजपा कार्यालयात त्यांनी अनौपचारिक भेट दिली.यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यानंतर देशभरातून प्रतिक्रीया उमटत आहेत. दरम्यान, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे गुजरात राज्यात होत असलेल्या विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर सुरत येथून जळगांवकडे परतत असतांना त्यांनी नंदुरबार येथील भाजपा कार्यालयाला भेट दिली.यावेळी श्री.बावनकुळे प्रसारमाध्यमांशी बोलतांना म्हणाले, राज्यपाल नेमके कोणत्या संदर्भात बोलले ते माहिती नाही.मात्र छत्रपती शिवाजी महाराज अनेक पिढ्यांपासून आदर्श आहेत आणि आदर्शच राहतील.शिवरायांची तुलना कोणाशीही होवू शकत नाही.यामुळे प्रत्येकाने त्यांचा आदर राखण्याचे आवाहन त्यांनी केले.
दरम्यान, भाजपा कार्यालयात आदिवासी विकासमंत्री डॉ.विजयकुमार गावित, जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ.सुप्रिया गावित, खा.डॉ.हीना गावित यांनी प्रदेशाध्यक्ष आ.चंद्रशेखर बावनकुळे यांची सदिच्छा भेट घेतली. याप्रसंगी भाजपा जिल्हाध्यक्ष विजय चौधरी, जिल्हा उपाध्यक्ष युवराज राजपूत, नंदुरबार तालुकाध्यक्ष दीपक पाटील,ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष महेंद्र पटेल, अक्कलकुवा तालुकाध्यक्ष विनोद कामे, धडगाव तालुकाध्यक्ष आकाश अहिरे, शहादा शहर महामंत्री जितेंद्र वर्मा, प्रकाशा मंडळाध्यक्ष ईश्वर पाटील, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष हर्षल पाटील, ओबीसी मोर्चा प्रदेश सचिव प्रकाश गवळे, शहादा शहराध्यक्ष विनोद जैन, ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष राहुल शेंडे, शहादा शहर महामंत्री हितेंद्र वर्मा, कामगार आघाडी जिल्हा उपाध्यक्ष जॅकी सीकलीकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.








