नंदुरबार l
मराठा समाजातील बेरोजगार युवकांसाठी व्यवसायाकरीता असलेल्या अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळामार्फत व्यवसाय निर्मितीसाठी नंदुरबार शहरासह जिल्ह्यातील बँकांकडून कर्ज देण्यास टाळाटाळ होत आहे. व्यवसायासाठी बँकांकडून कर्ज त्वरीत उपलब्ध करुन देण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाचे नंदुरबार शहर समन्वयक प्रविण महेश मराठे यांनी केली आहे.
याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यात म्हटले आहे की, मराठा समाजातील युवक-युवतींनी स्वतःच्या पायावर उभे रहावे, तसेच त्यांना रोजगार उपलब्ध व्हावा, यासाठी महाराष्ट्र राज्य शासनामार्फत अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाकडून व्यवसायासाठी कर्ज उपलब्धतेची योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत बँकेकडून व्यवसायाकरीता कर्ज उपलब्ध करुन दिले जाते.
परंतु नंदुरबार शहरासह जिल्ह्यातील अनेक बँकांकडून वेगवेगळ्या अटी-शर्ती टाकून मराठा समाजातील युवक-युवतींना व्यवसाय, रोजगारासाठी असलेल्या अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजनेच्या लाभापासून वंचित ठेवले जात आहे. योजनेमार्फत बँकांकडून मराठा समाजातील युवकांनी कर्जाची मागणी केल्यावर मालमत्ता गहाण ठेवण्यास बंधनकारक केले जात आहे. आवश्यक कागदपत्रे देवुन देखील कर्ज घ्यावयाचे असेल तर मालमत्ता गहाण ठेवणे आवश्यक असेल, असे सांगितले जाते.
तसेच कर्ज देण्यासाठी फिरवाफिरव केली जाते? संबंधित बँक अधिकार्यांकडून उडवाउडवीची उत्तरे दिली जातात, यामुळे स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी व्यवसाय निर्मितीकरीता कर्ज घेणार्या मराठा समाजातील युवकांना योजनेच्या लाभापासून वंचित ठेवण्याचा प्रकार बँकेकडून सुरु आहे. म्हणुन यासंदर्भात आपण त्वरीत दखल घेवुन मराठा समाजातील युवकांना अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळामार्फत मिळणार्या कर्ज योजनेचा लाभ त्वरीत मिळवुन द्यावा, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाचे नंदुरबार शहर समन्वयक प्रविण महेश मराठे यांनी निवेदनातून केली आहे.








