नंदुरबार l प्रतिनिधी
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७५३ ब ( नेत्रंग – शेवाळी ) हा नंदुरबार शहराच्या बाहेरून जातो . या महामार्गावर नवापूर चौफुली ते करण चौफुली दरम्यान खड्डे पडले आहेत . यामुळे अपघात होत आहेत . याच्या निषेधार्थ नागरिकांनी खड्यांमध्ये राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या 5 यंत्रणेचा पुतळा गाडून अनोखे आंदोलन केले.
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७५३ ब (नेत्रंग-शेवाळी) हा नंदुरबार शहराच्या बाहेरून जातो. हल्ली सदर महामार्गावरील वाहतूक देखील वाढली आहे परंतु वाढलेला वाहतुकीला गृहीत धरुन सदर महामार्गाची बांधणी करण्यात आलेली नाही. तसेच अनेक ठिकाणी साईटपट्ट्या देखील अगदी छोट्या स्वरूपाच्या आहेत. या महामार्गवर नवापूर चौफुली ते करण चौफुली पर्यंत अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे आहेत, या खड्ड्यांमध्ये रोज अपघात घडतात. काही खड्ड्यांमुळे तर मृत्यू देखील घडले आहेत. सदर खड्ड्यांमुळे सामान्य नागरिकांचे आर्थिक, शारीरिक व मानसिक नुकसान होते. सदर खड्डे अनेक वर्षांपासून जसेच्या तसेच आहेत किंबहुना या खड्ड्यांची खोली मागील एक ते दीड वर्षात वाढली आहे. परंतु महामार्ग विभागाच्या सुस्त कारभारामुळे सदर खड्ड्यांची डागडुजी किंवा दुरूस्ती करण्यात येत नाही. या खड्ड्यांमुळे भविष्यात होणारे अपघात टाळावेत यासाठी सदर महामार्ग विभागाच्या प्रशासनाचा प्रतिकात्मक पुतळा आज धुळे चौफुली वरील खड्ड्यांमध्ये गाडण्यात आला. याच धुळे चौफुली वरील महामार्गावरून पालकमंत्री, खासदार, जिल्हाधिकारी महोदय यांचे देखील ये-जा होतच असणार.परंतु तरीही सदर रस्त्याची दुरुस्ती का होत नाही हा अचंबित करणारा प्रश्न आहे.सदर महामार्ग प्रशासनाच्या पुतळ्यावरून ज्यावेळेस वाहन जातील त्यावेळेस कदाचित महामार्ग विभागातील अधिकाऱ्यांना या खड्ड्यांची किंवा खड्ड्यांमुळे होणाऱ्या नुकसानाची जाणीव होईल . येत्या आठ ते दहा दिवसात जर सदर रस्त्यावरील सर्व खड्डे कायमस्वरूपी बुजवण्यात आली नाहीत तर भविष्यात यापेक्षा अनोखे आंदोलन करण्यात येईल असे आंदोलन कर्त्यानी इशारा दिला आहे.यावेळी दिग्विजय राजपूत, भूषण राजपूत, सागर मराठे, किरण पाटील आदी उपस्थित होते.