नंदूरबार l प्रतिनिधी
राज्यातील ७ हजार ७५१ ग्रामपंचायतींसाठी काल सार्वत्रिक निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला.यात नंदुरबार जिल्ह्यातील १२३ ग्रामपंचायतींच्या थेट सरपंच पदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी १८ डिसेंबर २०२२ रोजी मतदान होणार आहे.

ऑक्टोबर २०२२ ते डिसेंबर २०२२ या कालावधीत मुदत संपणाऱ्या तसेच नव्याने स्थापित या सर्व ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी १८ नोव्हेंबर रोजी संबंधित तहसिलदार निवडणुकीची सूचना प्रसिद्ध करतील. नामनिर्देशनपत्र २८ नोव्हेंबर ते २ डिसेंबर २०२२ या कालावधीत दाखल करण्यात येतील. नामनिर्देशनपत्रांची छाननी ५ डिसेंबर रोजी होईल. नामनिर्देशनपत्र मागे घेण्याची अंतिम मुदत ७ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत असेल व त्याच दिवशी निवडणूक चिन्हांचे वाटप होईल. मतदान १८ डिसेंबर रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत होईल.
तसेच नक्षलग्रस्त भागात दुपारी ३ वाजेपर्यंतच मतदानाची वेळ असेल. मतमोजणी २० डिसेंबर रोजी होईल.यात नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील ३१, नवापूर तालुक्यातील १६, अक्राणी तालुक्यातील ४७, नंदुरबार तालुक्यातील १८, शहादा तालुक्यातील १० तर तळोदा तालुक्यातील एका ग्रामपंचायतीसाठी सार्वत्रिक निवडणूक घेण्यात येणार आहे.

नंदूरबार तालुक्यात १८ ग्रामपंचायती
नंदुरबार तालुक्यातील ढंढाणे, रनाळे, तलवाडे बुद्रूक, रजाळे, आसाणे, घोटाणे, ओसर्ली, सातुर्खे, कानळदे, खैराळे, कोठडे, धानोरा, करणखेडा, तिसी, अमळथे, चौपाळे, राकसवाडे, घुली या ग्रामपंचायतीत निवडणुका आहेत.

धडगाव तालुक्यात ४७ ग्रामपंचायती
धडगाव तालुक्यातील मांडवी बुद्रुक, मक्तारझिरा, मांडवी खुर्द, वावी, खडकला खुर्द, जुगणी, बोदला, निगदी, भमाणे, भाबर, उडद्या, राजबर्डी, कुवरखेत, कात्रा, तेलखेडी, कुकलट, शेलकुई, वलवाल, तोरणमाळ, केलापाणी, खडकी, झापी, सिंदीदिगर , फलाई, भादल, कुंड्या, रोषमाळ खुर्द, कुंभरी, अट्टी, थुवानी, डुट्टल, कुकतार, डोमखेडी, गेंदा, माळ, खुटवाडा, शेलदा, पिंपळबारी, चांदसेली, बिजरी, सिरसाणी, गोया, कामोद खुर्द, चिखली, बिलगाव, त्रिशूल आणि सावया दिगर या ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक होणार आहे.

अक्कलकुवा तालुक्यात ३१ ग्रामपंचायती
अक्कलकुवा, खापर, पोरांबी, डेब्रामाळ, कुकडीपादर, डणेल, मणिबेली, मोलगी,भगदरी, भाबलपूर, घंटाणी, विरपूर, सोरापाडा, अलीविहीर, बिजरीगव्हाण, खडकुना, मंडारा, खाई, कोलवीमाळ, कंकाळामाळ, कुवा, बेडाकुंड, बोखाडी, वडीबार, पेचरीदेव, ओहवा, वेली, उमरागव्हाण , चिवलउतार, माळ या ग्रामपंचायतींमध्ये निवडणुका रंगणार आहेत.

शहादा तालुक्यात १० ग्रामपंचायती
शहादा तालुक्यातील कळंबू, खैरवे, निंभोरा, बहिरपूर, बिलाडीतर्फ हवेली,म्हसावद, धांद्रे बुद्रूक, पाडळदे बुद्रूक, कलमाडी तर्फ बोरद , जीवननगर या ग्रामपंचायतीत निवडणुका आहेत.

नवापूर तालुक्यात १६ ग्रामपंचायती
नवापूर तालुक्यात शेही, भांगरपाडा, नानगीपाडा, अंठीपाडा, खडकी, वन्हाडीपाडा, शेगवे, विसरवाडी, खेकडा, वाटवी, वावडी, गंगापूर, करंजवेल (नवनिर्मित), वाटवी ( नवनिर्मित), पाटी (नवनिर्मित), बेडकी ( नवनिर्मित) या ग्रामपंचायतीत निवडणुका होतील. तर तळोदा तालुक्यातील राजविहीर या एकमेव ग्रामपंचायतीसाठी मतदान होणार आहे.

जिल्ह्यातील १२३ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आल्याने आता ऐन हिवाळ्यात पुन्हा एकदा ग्रामीण आखाडा तापणार आहे. लोकनियुक्त सरपंच पद असल्याने अनेक इच्छुकांकडून निवडणूक लढविण्याची तयारी केली जात आहे.तर आता राजकीय पक्षांकडूनदेखील प्रत्येक ग्रामपंचायतीवर आपल्या पक्षाचा झेंडा फडकावा यासाठी तयारी करण्यात येणार आहे.दरम्यान, अचानक सार्वत्रिक निवडणुकींचा बिगुल वाजल्याने आता इच्छुकांना कागदपत्रांची जमवाजमव करण्यासाठी चांगलीच दमछाक होणार आहे.








