नंदुरबार l प्रतिनिधी
नंदूरबार येथे सुरक्षा कीट विना खाजगी वायरमनचा जीव धोक्यात टाकून पोलवर चढविण्यात येते.या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
महावितरण नेहमीच या त्या कारणाने चर्चेत राहतं, कधी ग्राहकांकडून अवाजवी वीज बिले आकारणी तर कधी अंदाजे वीजबिले यामुळे अनेकदा ग्राहकांच्या रोषाला देखील महावितरणला सामोरे जावे लागते. बऱ्याचदा याबाबत ग्राहकांकडून तक्रारी करून देखील याची महावितरण करून दखल घेतली जात नाही. यामुळे बऱ्याचदा वाद देखील उद्भवतात.
मात्र आता महावितरण चा एक अनोखा प्रकार समोर आला आहे. महावितरण कडून खाजगी वायरमनला नियुक्ती करून थेट पोलवर चढविण्यात येते. मात्र खासगी वायरमन पोलवर चढत असताना त्याला कोणत्याही प्रकारचे ग्लोज किंवा सुरक्षा कीट न पुरविता पोलवर चढवण्यात येत असल्याने अपघात घडण्याची शक्यता आहे.
अशा प्रकारचे अपघात बऱ्याच ठिकाणी घडलेले असताना देखील महावितरणाने यातून कोणताही धडा घेतलेला नाही. यामुळे अपघातात जीव गेल्यास याला जबाबदार कोण असा सवाल देखील या निमित्ताने उपस्थित केला जात आहे. दरम्यान नंदुरबार तालुक्यातील कोपर्ली तसेच बयाने परिसरात देखील अशा घटना घडल्या होत्या.
महावितरण कर्मचारी विद्युत पोलवर चढलेले असताना अचानक वीज पुरवठा सुरू झाल्याने अमळथे येथील वीज पोलवर चढलेल्या कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला होता. या घटनेस आता वर्षाचा कालावधी देखील पूर्ण झालेला नाही. तोच महावितरणने या दुर्घटनेतून कोणताही धडा न घेतल्याने अपघाताची शक्यता वाढली असून यातून एखाद्याचा जीव जाण्याची देखील शक्यता आहे.
सुरक्षा किटविना कर्मचारी विद्युत पोलवर चढल्यास त्याचा जीव गेल्यास याची जबाबदारी महावितरण घेणार का? असा देखील सवाल उपस्थित केला जात आहे. यामुळे नेहमीच हलगर्जीपणा करणाऱ्या महावितरण कंपनीने सदरची बाब गांभीर्याने घेऊन सुरक्षिततेसाठी किट पुरवाव्या अशा अपेक्षा देखील या निमित्ताने व्यक्त केल्या जात आहेत.