नंदुरबार | प्रतिनिधी
नंदुरबार जिल्ह्यात लम्पी स्कीन रोगाच्या पार्श्वभूमीवर पशुसंवर्धन विभागातर्फे खबरदारी घेत १०० टक्के लसीकरण केले आहे. यात जिल्ह्यातील ३ लाख ३ हजार ३६५ पशुधनास लसीकरण करण्यात आले आहे. ३४ गावातील सुमारे १०९१ जनावरांना लम्पीची बाधा झाली होती. यातील ७२२ जनावरे उपचारादरम्यान बरी झाली असून २७३ जनावरांवर उपचार सुरु आहेत. अद्यापपावेतो ९६ जनावरे लंम्पीने दगावली आहेत.
नंदुरबार जिल्ह्यातील सुमारे ३ लाख ३ हजार ३६५ गोवर्गीय पशुधनांपैकी लम्पीच्या पार्श्वभूमीवर ३ लाख ४ हजार ३०० लस मात्रा उपलब्ध झाल्या होत्या. पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त यु.डी.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पशुसंवर्धन विभागाने १०० टक्के पशुधनास लसीकरण केले आहे. दरम्यान, लम्पीमुळे ३४ गावातील १ हजार ९१ इतक्या जनावरांना लंम्पीची बाधा झाली होती. यातील ७२२ जनावरे औषधोपचाराने बरी झाली आहेत. तर सद्यस्थितीत २७३ जनावरांवर उपचार सुरु आहेत. लम्पीमुळे ९६ जनावरे दगावली आहेत. यातील ६२ जनावरांची नुकसान भरपाई प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे. लम्पीवर नियंत्रण आणण्यासाठी जिल्ह्यात ४८ जलद कृतीदल कार्यरत आहेत.
नंदुरबार तालुक्यात ४२ हजार ९५३ इतके गोवर्गीय पशुधन असून यातील पाच गावातील २७ जनावरांना लम्पीची बाधा झाली होती. यातील १६ जनावरे औषधोपचारादरम्यान बरी झाली असून सद्यस्थितीत ८ जनावरांवर औषधोपचार सुरु आहेत. दरम्यान, ३ जनावरे दुर्देवाने दगावली असून दोघांना नुकसान भरपाई देण्यात आली आहे.नवापूर तालुक्यात ६० हजार ९१ गोवर्गीय पशुधन असून एका गावात लम्पीची बाधा झाल्याने येथील ६ जनावरे बाधीत झाली होती. त्यातील ४ जनावरे औषधोपचारादरम्यान बरी झाली असून एका जनावरावर उपचार सुरु आहेत.
तर एक उपचारादरम्यान दगावले असून त्याची भरपाई देण्यात आली आहे.शहादा तालुक्यात ४८ हजार ५७१ गोधन असून ७ गावांमधील ९९ जनावरांना लम्पीची बाधा झाली होती. यातील ८५ जनावरे औषधोपचारानदरम्यान बरी झाली असून ९ जनावरांवर उपचार सुरु आहेत तर ५ जनावरे उपचारादरम्यान दगावली असून यातील तिघांना भरपाई देण्यात आली आहे.तळोदा तालुक्यात ३४ हजार ५१० जनावरे असून यातील ५ गावे बाधीत झाल्याने २४ जनावरांना लम्पीची बाधा झाली होती. यातील १२ जनावरे बरी झाली असून ७ जनावरांवर उपचार सुरु आहेत. तर ५ जनावरे दगावली आहेत.अक्कलकुवा तालुक्यात ४६ हजार ४५७ जनावरे असून यातील ७ गावांमध्ये लम्पीची बाधा झाल्याने ३०६ जनावरांवर उपचार करण्यात आले. यातील २२५ जनावरे बरी झाली असून सद्यस्थितीत ५९ जनावरांवर उपचार सुरु आहेत.
तर २१ जनावरे दगावली असून त्यातील १४ जनावरांची भरपाई देण्यात आली आहे. तर धडगाव तालुक्यातील सर्वाधिक ७० हजार ७८३ इतके पशुधन असून यातील ९ गावे बाधीत झाल्याने ६२९ जनावरांना लम्पीची बाधा झाली होती. त्यातील ३८० जनावरे उपचारादरम्यान बरी झाली असून सध्या १८९ जनावरांवर उपचार सुरु आहेत. दरम्यान, उपचारादरम्यान ६१ जनावरे दगावली असून यातील ३७ जनावरांची भरपाई देण्यात आली आहे.लम्पी नियंत्रणासाठी व लसीकरणासाठी तसेच गंभीर पशु रुग्णांवर उपचारासाठी जिल्फात ४८ जलद कृतीदल कार्यरत आहेत. यात नंदुरबार तालुक्यात ८, नवापूर ९, शहादा १५, तळोदा ३, अक्कलकुवा ७ तर धडगाव तालुक्यात ६ कृतीदल कार्यरत आहेत.