शहादा l प्रतिनिधी
तालुक्यातील तापी नदीवरील पुलांसह रस्त्यांची प्रचंड दुरावस्था झाली असून बांधकाम विभागा मार्फत चालढकल केली जात असल्याने तीव्र नाराजीचा सूर व्यक्त केला जात आहे. येत्या आठवडाभरात रस्त्यांच्या दुरुस्तीला प्रारंभ न झाल्यास तीव्र आंदोलन उभारण्याचा इशारा भारतीय जनता पक्षाच्या वतीने देण्यात आला आहे.
तालुक्यातील सारंगखेडा व प्रकाशा येथील पुलासह रस्त्यांची प्रचंड दुरावस्था झाली आहे. याबाबत वाहनधारकांसह परिसरातील शेतकरी व विविध पक्षीय कार्यकर्त्यांच्या वतीने वेळोवेळी मागणी करण्यात आली आहे. यापूर्वी प्रकाशा, सारंखेडा व दराफाटा येथे रस्ता दुरुस्तीबाबत विविध संस्था, संघटना व पक्षीयांच्या वतीने आंदोलन ही करण्यात आले होते. सार्वजनिक बांधकाम विभाग व जिल्हा प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या वतीने आंदोलनादरम्यान आश्वासन देण्यात आले आहे.मात्र किरकोळ डागडुजी व्यतिरिक्त कोणतेही ठोस काम करण्यात आलेले नसल्याने वाहनधारकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.
या पूल व रस्त्यावरून वाहन चालवणे जिकिरीचे ठरत असून अपघाताला निमंत्रण देणारे ठरत आहे. सारंगखेडा व प्रकाशा येथील तापी नदीवरील पुलाची तर प्रचंड दुरावस्था झाली आहे. डामरखेडा येथील तापी नदीवरील पूल तसेच तालुक्यातील लहान मोठ्या नद्यांवरील पुलांचीही दुर्दशा झाली असून कधीही लहान मोठा अपघात संभवतो. यातून निष्पाप लोकांचे बळी जाण्याची शक्यता आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच जिल्हा प्रशासनाने झोपेचे सोंग घेतले असल्याने रस्त्यांच्या दुरावस्थेत दिवसेंदिवस भर पडत आहे. या रस्त्यावरून जिल्हा प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी तसेच लोकप्रतिनिधी सातत्याने येजा करतात.मात्र त्यांचेही याकडे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांकडून तीव्र नाराजीचा सूर व्यक्त केला जात आहे.

याची दखल घेऊन भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील, भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष रमाशंकर माळी, जिल्हा सरचिटणीस जितेंद्र जमदाडे, शहादा शहर अध्यक्ष विनोद जैन यांच्यासह भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तीव्र स्वरूपाचे आंदोलन उभारण्याचा इशारा दिला असून येत्या सात दिवसात रस्ता दुरुस्ती कामास सुरुवात न झाल्यास अचानक आंदोलन उभारण्यात येईल व त्याची सर्वस्वी जबाबदारी शासन प्रशासनाची राहील असे म्हटले आहे.








