नंदुरबार | प्रतिनिधी
दिवाळीनिमित्त अन्न व नागरी पुरवठा मार्फत वितरित करावयाचे दिवाळी किट नंदुरबार तालुक्यास प्राप्त झालेले असून पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्या हस्ते नंदुरबार शहरातील लाभार्थ्यांना दिवाळी कीट वितरण करण्यात आली.
यावेळी खा.डॉ. हिना गावित, जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावीत, तहसीलदार भाऊसाहेब थोरात ,नायब तहसीलदार रमेश वळवी, नायब तहसीलदार श्री. बोरसे, पुरवठा निरीक्षक श्रीमती चौरे, अव्वल कारकून रवी घोडसे , मंडळ अधिकारी मदन कावळे, प्रशांत देवरे उपस्थित होते.पात्र शिधापत्रिकाधारक यांना प्रतिनिधीक स्वरूपात आनंदाचा शिधा वितरीत करण्यात आली.तहसील कार्यालयाजवळील ५ रेशन दुकानदार यांचे १२५ लाभार्थ्यांना दिवाळी किट वाटप करण्यात आले.सदर दिवाळी किटमध्ये एक किलो साखर, एक किलो रवा, एक किलो चणाडाळ व एक लिटर तेल अशा चार वस्तू असून त्यांची किंमत १०० रुपये आहे .
शिधापत्रिकाधारकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.लवकरात लवकर सर्व गावांमध्ये सर्व कुटुंबांना दिवाळीचा शिधा वितरीत करण्यासाठी पुरवठा विभाग मेहनत घेत आहे.आज पर्यंत एकूण १८७ दुकानांपैकी १५३ दुकानात वाटप सुरू असून उशिरापर्यंत सर्व दुकानात वाटप सुरू करण्यात येईल,तसेच ई पॉज मशीन मध्ये तांत्रिक अडचण आल्यास ऑफलाइन देखील वाटप करण्याची मुभा रेशन दुकानदार यांना देण्यात आलेली असून एखादी वस्तू विलंबाने दुकानापर्यंत पोहोचत असल्यास दुकानातील प्राप्त झालेल्या वस्तू तातडीने शिधापत्रिकाधारक यांना वितरित करण्याच्या विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांचे निर्देश आहेत.
यावेळी शासकीय दिवाळी थेट व्यतिरिक्त तहसील कार्यालयाचे अधिकारी व कर्मचारी यांच्या वतीने उपस्थित विधवा भगिनी तसेच बालगोपाळांना मिठाईचे वाटप करण्यात आले.मागील वर्षी सुद्धा कोरोनामुळे अडचणीत आलेल्या देहविक्री करणार्या महिलांना दिवाळी फराळ व मिठाई वाटप करण्यात आले होते.








