नंदूरबार l प्रतिनिधी
नवापुर नगर परिषदेत कार्यरत कंत्राटी सफाई कामगार, कुशल, अकुशल कामगार व इतर आस्थापनेवर मानधन तत्वावर कार्यरत असलेल्या कामगारांना दिवाळी पूर्वी मागील महिन्यातील राहिलेला वेतन व दिवाळी सण साजरा करण्यासाठी दिवाळीपूर्वी आगाऊ रक्कम देण्याची मागणी भाजपा नवापूर तालुकाध्यक्ष भरत गावीत यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

या निवेदनात म्हटले आहे की, आपल्या नवापुर नगर परिषद, नवापुर जि.नंदुरबार यात विविध आस्थापनेत मजूर पूरवण्याकामी संबंधी निविदा मागवून अटी शर्तीं व शासन नियमानुसार किमान वेतन अंतर्गत कंत्राटी कामगारांची नेमणूक ठराविक संस्थेला निविदा देऊन आपण प्रक्रिया पार पाडली आहे. तसेच घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत प्रशासकीय तांत्रिक मंजुरी घेऊन एका संस्थेला किंवा पात्र निविदाधारक ठेकेदारास कंत्राट देण्यात आला आहे. यात अटी शर्तीं नुसार दर महिन्याचा 10 तारखेच्या आत कंत्राटी कुशल, अकुशल, सफाई कामगार व इतर आस्थापनेत मानधन तत्वावर काम करणाऱ्या कामगारांना वेतन अदा करणे ठेकेदाराला बंधनकारक आहे.
मात्र माहे ऑगस्ट 2022 व माहे सप्टेंबर 2022 या दोन महिन्याचा पगार ठेकेदाराने कामगारांना अदा केलेला नसल्याचे समजले आहे तसेच सर्वात मोठा दिपावली सण ऑक्टोबर महिन्याचा अखेरीस येत असल्याने गोरगरीब कामगारांनी हा सण कसा साजरा करावा हा सर्वात मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. ऑक्टोबर महिन्याची 15 तारीख संपण्यात येत आहे तरी अद्याप कामगारांना मागील 2 महिन्याचा थकीत पगार दिलेला नाही.
आपण मुख्य मालक या नात्याने संबंधित ठेकेदारांना सूचना देऊन कामगारांना राहिलेला वेतन मिळवून देण्यास सहकार्य करावे तसेच कामगारांना दिवाळी सण साजरा करण्यासाठी ऑक्टोबर महिन्याचा पगार ॲडव्हान्स स्वरूपात देण्यासाठी प्रयत्न करण्यात यावे. मागील 2 वर्ष कोरोना काळात शासनाचे निर्बंध असल्यामुळे सण साजरा करता आले नाही मात्र यावर्षी कोरोना मुक्त वातावरणात सण साजरा करण्यात येत आहेत आपण कामगारांचा विषयात जातीने लक्ष देऊन गोर गरीब कामगारांना न्याय मिळवून देण्यास सहकार्य करावे. अशी मागणी करण्यात आली आहे.
नवापुर भाजपा तालुकाध्यक्ष भरत गावित यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका सरचिटणीस जयंतीलाल अग्रवाल यांनी नवापुर नगर पालिकेच्या कार्यालयीन अधीक्षक अनिल सोनार यांना निवेदन दिले








