नंदूरबार l प्रतिनिधी
विविध मागण्यांसाठी समुदाय आरोग्य अधिकार्यांनी जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन करत बेमुदत काम बंद केले आहे.
याबाबत नंदुरबार जिल्हा समुदाय आरोग्य अधिकारी संघटनेतर्फे जिलहाधिकार्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जिल्हा स्तरावर मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी यांना दि.२२ सप्टेंबर २०२२ रोजी प्रलंबित मागण्याबाबत व होणार्या आर्थिक पिळवणूकीबाबत निवेदन सादर केले आहे.
त्या संदर्भात नियिमित पाठपुरावा केला आहे. तरीदेखील योग्य तो न्याय मिळाला नाही.जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली दि. २९ सप्टेंबर २०२२ रोजी दुपारी १ वाजता झालेल्या बैठकीत जिल्हा आरोग्य प्रशासनाकडून कामावर आधारित मोबदल्याचे व हार्डशिप अलाऊन्सचे मुल्यांकन हे अयोग्यरित्या व अन्यायकारक रितीने करण्यात आले आहे. हे आरोग्य विभागानेही मान्य केले आहे.
वरिष्ठांना वेळोवेळी होणार्या अन्यायाबाबत लेखी निवेदन देऊनदेखील न्याय मिळत नसेल तर बेमुदत काम बंद व धरणे आंदोलनाशिवाय सद्यस्थितीत कोणताही पर्याय नाही. म्हणून मागण्या (ऑगष्ट २०२२ पर्यंतचा पीबीआय व हार्ड एरीया अलाऊन्स, एप्रिल व मे २०२२ चा अन्यायकारक रितीने कपात केलेला रकमेचा फरक व दरमहा नियमित वेतन) हे दि.८ ऑक्टोबर २०२२ पर्यंत पूर्ण न झाल्यास कामबंद आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यामुळे समुदाय आरोग्य अधिकार्यांनी जिल्हा परिषदेसमोर आज दि. ११ ऑक्टोबरपासून धरणे आंदोलन करत बेमुदत कामबंद पुकारले आहे.








