नंदूरबार l प्रतिनिधी
बंद घराच्या पुढील दरवाजाचे कडी कोंडा तोडून चोरट्यानी कपाटातील एक लाख रुपयांची रोकड व दोन तोळे सोने असा दोन लाखांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केल्याची घटना तळोदा शहरातील जोशी नगर मध्ये शुक्रवारी घडली.
या प्रकरणी पोलिसात रविवारी रात्री उशीरा पर्यंत गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू होती दरम्यान चोरट्यानी बंद घरे फोडण्याचा पुन्हा एकदा धडाका सुरू केल्याने नवीन वसाहत धरकांमध्ये प्रचंड भीती पसरली असून पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवण्याची मागणी होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार तळोदा शहरातील जोशी नगर येथील प्रकाश रोहिदास सोनवणे (वय ३६) हे आपल्या नातेवाईकांचा व्हिसा काढण्यासाठी शुक्रवारी मुबई येथे गेले होते. त्यामुळे घरालाही कुलूप लावले होते.
नेमकं हीच संधी साधत चोरट्यांनी शुक्रवारी मध्यरात्रीनंतर बंद घराच्या पुढील दरवाजाचे कडी कोंयंडा तोडून घरात प्रवेश करत कपाटात ठेवलेली एक लाखाची रोकड व दीड तोळ्याची गळ्यातील सोन्याची माळ, व कानातील पाच ग्रॅम चे दागिने असा एकूण साधारण दोन लाखाचा ऐवज लंपास केला. विशेष म्हणजे चोरट्यांनी घरातून चोरी केल्यानंतर पुढचे दार लावून त्यावर फडके झाकून ठेवले होते. सोनवणे कुटुंब रविवारी सायंकाळी घरी परतल्या नंतर त्यांना पुढील दरवाजाच्या कडी कोयंडा तोडल्याचे दिसून आले.
शिवाय बेडरूम मधील कपाटातील सामानही अस्थ व्यस्थ केला होता शिवाय कपाटातील रोकड व सोन्याचे दागिने लंपास झाल्याचे लक्षात आले. चोरी बाबत त्यांनी पोलिसांना कळविल्यानंतर पोलीस लागलीच घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा करण्यात आला. याबाबत रात्री उशिरा पर्यंत गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू होती. दरम्यान नवीन वसाहतींमध्ये पुन्हा चोरट्यांनी चोरीचे सत्र सुरू केल्याने परिसरामध्ये प्रचंड घबराहट पसरली आहे.








