नंदुरबार l प्रतिनिधी
लायन्स क्लब फेमिनाने जुलै २०२० पासून कोरोनाचे संकट समोर असतानाही समाजकार्यासाठी जेथे कमी तेथे आम्ही या भूमिकेतून मोठ्या प्रमाणावर सेवा कार्य केले. समाजकार्याचा झाला उचित गौरव करताना लायन्स फेमिना क्लबला विविध आठ पुरस्कार देवून गौरविण्यात आले.
लायन्स परिवारात डिस्ट्रिक्ट कॉंफेरन्सच्या माध्यमातून प्रत्येक क्लबच्या सेवा कार्याचा आढावा घेण्यात येतो व पुरस्कार देण्यात येतात. यंदा ही कॉंफेरन्स औरंगाबाद येथे घेण्यात आली. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून माजी शिक्षण मंत्री राजेंद्र दर्डा, लायन्सचे प्रांतपाल विवेक अभ्यंकर, उपप्रांतपाल दिलीप मोदी आदी मान्यवर उपस्थित होते. यात नंदुरबार लायन्स फेमिना क्लबला एकुण ८ पुरस्कार देवून गौरविण्यात आले. यात प्रामुख्याने जी एल टी आचिवमेंट, बेस्ट अपकमिंग वूमन लिडरशिप, वुमन इम्पॉवरमेंट अवॉर्ड, सॅनिटरी पॅड मेकिंग प्रोजेक्टला बेस्ट पर्मनंट प्रोजेक्ट व सिग्नेचर ऍक्टिव्हिटी अवॉर्ड, तसेच वर्षभर भरीव सेवाकार्य केल्याबद्दल ऍप्रिसिएशन अवॉर्डने सन्मानित करण्यात आले. तसेच क्लबच्या अध्यक्षा डॉ.सौ.गायत्री पाटील यांना मानाचा मल्टीपल न्यु व्हॉइस इनीशिएटीव्ह अवॉर्ड देवून सन्मानित करण्यात आले. क्लबला मिळालेले यश हे डिस्ट्रिक्ट, रिजन, झोनचे पदाधिकारी यांचे मार्गदर्शन, क्लब सदस्यांचे सहकार्य, परिवाराची भक्कम साथ यामुळेच मिळाले असल्याची भावना अध्यक्षा डॉ.सौ.गायत्री पाटील यांनी व्यक्त केली. कोरोना काळात परिवार व समाजाची काळजी घेत या महिलांच्या क्लबने केलेल्या समाजकार्यामुळे नंदुरबारचे नाव लायन्स वर्तुळात उंचावले गेले म्हणून समाजातून अभिनंदन होत आहे.