नंदूरबार l प्रतिनिधी
बहुचर्चित आणि न्यायालयीन पातळीवर महत्वपूर्ण ठरलेल्या शिवसेनेच्या परंपरागत शिवाजी पार्क वरील दसरा मेळाव्यासाठी नंदुरबार जिल्ह्यातून शिवसेनेचे सुमारे ५००० कार्यकर्ते मुंबई कडे रवाना होत असल्याची माहिती शिवसेनेचे नंदुरबार जिल्हा प्रमुख व विधान परिषदेचे आ.आमश्या पाडवी यांनी दिली.
राज्यात शिंदे गटाने सरकार स्थापन केल्या नंतर जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना मुंबईच्या शिवाजी पार्क वरील दसरा मेळाव्याची उत्सुकता होती त्यातच शिवसेनेने अक्कलकुव्यातुन जिल्हा प्रमुख आमश्या पाडवी यांना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी विधान परिषदेवर आमदारकीची संधी देऊन आदिवासी कार्यकर्त्याला न्याय दिल्याची भावना जिल्हा वासियां मध्ये आहे .
त्या अनुषंगाने शिवसेना व उद्धव ठाकरे यांचे हात बळकट करण्यासाठी कार्यकर्त्यांनी आणि विशेषतः आमदार आमश्या पाडवी यांनी कंबर कसली आहे. त्याचाच परिणाम म्हणून जिल्ह्यातून सुमारे ५ हजार कार्यकर्ते मुंबई कडे रात्री रवाना झाले त्यासाठी अक्कलकुवा, धडगाव,नवापूर, शहादा,तळोदा नंदुरबार येथुन सुमारे ४५० चारचाकी वाहनांचे नियोजन करण्यात आले आहे.जिल्ह्यात वाहनांची कमतरता भासु नये यासाठी गुजरात व मध्यप्रदेशच्या गावाजवळील वाहने बुक करण्यात आले आहेत.
तर काही पदाधिकारी व कार्यकर्ते हे स्वताच्या वाहनाने रवाना झाले आहेत,काही उत्साही कार्यकर्ते हे आधीच रेल्वे, लक्झरी बस,व मुंबईत कडे नियमित धावणार्या बसेस मधुन मुंबईला रवाना झाले आहेत.आधीच मुंबई कडे रवाना झालेले कार्यकर्ते आपल्या सोयीने मुक्काम करणार आहेत तर रात्री रवाना झालेले कार्यकर्ते दसरा मेळावा आटोपुन लगेच आपल्या गावकडे परतणार आहेत.








