नंदूरबार l प्रतिनिधी
नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार लोकसभा मतदार संघातून सलग नऊ वेळा खासदार म्हणून निवडून आलेले माजी खासदार तथा माजी केंद्रीय राज्यमंत्री माणिकरावदादा होडल्या गावित यांचे आज दि.17 सप्टेंबर रोजी सकाळी आठ वाजेदरम्यान दुःखद निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा उद्या 18 सप्टेंबर 2022 रोजी सकाळी अकरा वाजता नवापूर येथील सुमाणिक चौक येथून राहत्या घरापासून निघणार आहे.

दरम्यान आज सायंकाळी 5.45 वाजे दरम्यान दादांचे पार्थिव शरीर घरी आणण्यात आले.यावेळी परिवाराचे अश्रू अनावर झाले.दरम्यान उद्या नवापूर बंद ठेवण्यात आले आहे.
मागील आठ दिवसांपासून माणिकराव दादांची प्रकृती खालावली असल्याने नाशिक येथील सुयश हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. परंतु आज सकाळी आठ वाजेदरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. माजी खासदार माणिकराव दादा गावित यांनी देशात सलग नऊ वेळा खासदार म्हणून निवडून येण्याची विक्रमी नोंद केली होती.
त्यामुळे माणिकराव दादांना टॉप टेन खासदार म्हणून ओळखले जात असे. माणिकराव गावित हे माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या काळापासून काँग्रेस पक्षातून सलग नऊ वेळा नंदुरबार लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले आहेत. एक मनमिळाऊ लोकप्रिय खासदार म्हणून माणिकराव गावित यांनी आपली ओळख निर्माण केली होती. माजी खासदार माणिकराव गावित यांच्या पश्चात एक मुलगा, तीन मुली, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे. ते नंदुरबार जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा विद्यमान सदस्य, भाजपाचे नवापूर तालुकाध्यक्ष भरत गावित, इगतपुरीच्या माजी आमदार निर्मला गावित यांचे वडील तर जि. प. सदस्य संगीता भरत गावित यांचे सासरे होते.








