नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार तालुक्यातील ठाणेपाडा आश्रमशाळेसाठी पाणी पुरवठा करणारी विहिर हरवण्याची घटना घडली आहे.हा प्रताप चक्क पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता श्री.बाविस्कर यंानी केला आहे.त्यांनी विहिर खोदण्यात आली. मात्र त्यास पाणी लागले नसल्याचा अभिप्राय संबंधित इतिवृतात नोंदविला होता.मात्र प्रत्यक्षात त्या ठिकाणी विहिरच खोदण्यात आली नसून खोदकाम झाले नाही तर पाणी लागणार कसे? असा संतप्त सवाल जि.प.सदस्यांनी उपस्थित केला.
नंदुरबार जि.प.ची स्थायी समिती सभा जि.प.च्या याहामोगी सभागृहात संपन्न झाली. यावेळी अध्यक्षा ॲड.सीमा वळवी, उपाध्यक्ष ॲड.राम रघुवंशी, समाज कल्याण सभापती रतन पाडवी, महिला बालकल्याण सभापती निर्मला राऊत, सभापती गणेश पराडके, अजित नाईक, मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद पवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पाटील आदी उपस्थित होते.
यावेळी सभेदरम्यान पाणी पुरवठा विभागाचा आढावा सादर केला जात असतांना ठाणेपाडा आश्रमशाळेसाठी पाणी पुरवठा करणारी विहिर खोदण्यात आली. मात्र त्यास पाणी लागले नसल्याचा अभिप्राय संबंधित विभागाचे कार्यकारी अभियंता श्री.बाविस्कर यांनी इतिवृतात नोंदविला होता. यावर जि.प.सदस्य देवमन पवार यांनी प्रत्यक्षात त्या ठिकाणी विहिरच खोदण्यात आली नसून खोदकाम झाले नाही तर पाणी लागणार कसे? असा सवाल उपस्थित केला. यावर श्री.बाविस्कर यांनी सदस्यांच्या प्रश्नाला बगल देत सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, सभागृहात खोटी माहिती दिल्याने संबंधित अभियंत्यांवर कारवाई करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांनी सभागृहातील लोकप्रतिनिधींच्या भावनांचा आदर करण्यात यावा, सभागृहाची दिशाभूल करु नका, प्रत्येक विभाग प्रमुखाने स्वत: खात्री करुन मगच अहवाल सादर करा, कागदी घोडे नाचवू नका अशा सूचना दिल्या.
दरम्यान अंगणवाडी भरतीत स्थानिकांना प्राधान्य देण्यात यावे, असा जिल्हा परिेषदेच्या सर्वसाधारण सभेत ठराव झाला असतांनाही त्याची अंमलबजावणी झाली नाही. परिणामी धडगाव परिसरात यामुळे हाणामार्या होत असून अनेकदा वाद होतात. यामुळे सदरची बाब गांभीर्याने घेण्याची मागणी जि.प.सदस्य विजय पराडके यांनी केली. यावर महिला बालकल्याण अधिकारी कृष्णा राठोड यांनी शासन निर्णयात पाडा असा शब्दप्रयोग नसल्याने त्याचा समावेश करण्यासाठी शासनास प्रस्ताव पाठविला असल्याची माहिती दिली. यावर विजय पराडके यांनी सदरची बाब गांभीर्याने घेतली नाही आणि वाद उद्भवला तर मृतदेहच कार्यालयात ठेवणार असल्याचा इशारा दिला.








