नंदुरबार | प्रतिनिधी-
नंदूरबार तालुक्यातील नटावद येथील जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक नितीन पवार यांचे सुपूत्र कृणाल पवार यांनी गगनभरारी घेतली असून जिल्हयातून पहिले फ्लाईंग ऑफीसर अर्थात पायलट होण्याचा बहुमान मिळविला आहे.
दि. १८ जून रोजी भारतीय वायुसेन अकादमी हैद्राबाद येथे झालेल्या पासिंग आऊट परेड मध्ये भारतीय लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांच्या प्रमुख उपस्थितीत कृणाल पवार यांची फ्लाईंग ऑफीसर म्हणून नियुक्ती प्रदान करण्यात आली. यावेळी विमान व चॉपर यांच्या चित्तथरारक कसरती घेण्यात आल्या.
कृणाल पवार यंची वयाच्या २१ व्या वर्षी भारतीय वायुसेनेत सन २०२० मध्ये निवड झली होती. दोन वर्ष खडतर प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण करुन भारतीय वायुसेनेत त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कृणाल यांचे पहिली ते दहावीचे शिक्षण नंदुरबार येथील चावरा इंग्लीश मेडीयम स्कुलमध्ये झाले आहे. इयत्ता ११ वी व १२ वीचे शिक्षण औरंगाबाद येथील सैनिकी सेवापूर्व प्रशिक्षण केंद्रात झाले. त्यानंतर बी.एस्सी. भौतिकशास्त्रपर्यंतचे शिक्षण पुणे विद्यापिठात झाले.
पदवीच्या शेवटच्या वर्षात असतांना भारतीय वायुसेनेमार्फत घेण्यात येणार्या परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात कृणाल पवार हे यशस्वी झाले. त्यानंतर पाच दिवसांच्या एस.एस.बी. वायसेना ऍकेडमी गांधीनगर येथे प्रशिक्षण झाले. त्यावेळी त्यांच्या बॅचमध्ये केवळ कृणाल पवार यांची निवड करण्यात आली.
त्यानंतर पवार हे वायुसेना ऍकेडमी डेहराडून येथे पायलट पात्रता परीक्षाही यशस्वी झाले. त्यानंतर एरोस्पेस मेडीसीन सेंटर बँगलोर येथे वैद्यकीय चाचणी होवून त्यांना हैद्राबाद येथील वायुसेना ऍकेडमी येथे प्रशिक्षणासाठी पाठविण्यात आले. दोन वर्षाचे प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण करुन दि. १८ जून रोजी त्यांची फ्लाईंग ऑफीसर अर्थात पायलट पदावर जनरल मनोज पांडे यांच्यासह वायुसेनेतील वरिष्ठ अधिकार्यांच्या उपस्थितीत नियुक्ती करण्यात आली.
कृणाल पवार हे नटावद ता.नंदुरबार येथे जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक नितीन पवार यांचे पूत्र असून आई सौ.सुनिता पवार या गृहिणी आहेत. त्यांचा लहान भाऊ दहावीत असून त्यानेही भारतीय सेनेत जाण्यासाठी तयारी सुरु केली आहे.
कृणाल पवार हे जिल्हयातील पहिले पायलट ठरले आहे. नंदुरबार जिल्हयासाठी ही अत्यंत गौरवाची बाब आहे. त्यांच्याकडून भारत मातेसाठी चांगली सेवा घडो, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत असून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे.
जिल्हयातील जास्तीत जास्त युवकांनी भारतीय सेनेत अधिकारी होण्यासाठी परिश्रम घ्यावेत. त्यांना मार्गदर्शनासाठी सदैव तयार असेल, अशी प्रतिक्रिया कृणाल पवार यांनी व्यक्त केली आहे.