नंदुरबार | प्रतिनिधी
शहादा येथील वीज कंपनीचा कार्यालयात दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने दोघांनी वीज कंपनीचे सहायक अभियंता व सुरक्षा रक्षकाला शिवीगाळ करून मारहाण करीत कार्यालयाची तोडफोड केल्याची घटना घडली आहे.
याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शहादा शहरातील प्रकाशा रस्त्यावरील वीज कंपनीच्या कार्यालयात सुजीत खंडू पाटील रा.शिरपूर ह.मु.मनिषानगर (शहादा) हे कार्यालयात असतांना नागेश उर्फ ईश्वर रतन ठाकरे व अशोक दामू पवार रा.शिवाजीनगर (शहादा) यांनी
त्यांच्याकडून दारू पिण्यासाठी पैसे मागितले असता पैसे देण्यास नकार दिल्याने दोघांनी सहायक अभियंता यांना हाताबुक्यांनी मारहाण करून शिवीगाळ केली तसेच कोयत्याचा धाक दाखवून जिवेठार मारण्याची धमकी दिली.
तसेच कार्यालयातील साहित्याची तोडफोड करून दोन लोखंडी खुर्च्या घेवून जात असतांना सुरक्षा रक्षक हिरामण बिरारी यांनी त्यांना अडवले असता त्यांनाही दोघांना मारहाण करून कुर्हाड व कोयत्याचा धाक दाखवून शिवीगाळ केली.
याप्रकरणी सुजीत खंडू पाटील यांच्या फिर्यादीवरून नागेश उर्फ ईश्वर रतन ठाकरे व अशोक दामू पवार यांच्या विरूध्द शहादा पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३५३, ३३२, ५११, ३८४, ३२३, ५०४, ५०६, ३४ सह आर्मऍक्ट ४/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोसई जितेंद्र पाटील करीत आहेत.