नंदुरबार l प्रतिनिधी
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नंदुरबार यांच्यातर्फे आयोजित जिल्हास्तरीय उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबिराचा समारोप हि.गो.श्रॉफ हायस्कुलमध्ये झाला. या पंधरा दिवशीय शिबिरात शेकडो खेळाडूंनी आपला सहभाग नोंदविला.
यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी तथा नाशिक विभागीय क्रीडा उपसंचालक श्रीमती सुनंदा पाटील, हि.गो.श्रॉफ हायस्कुल प्राचार्या सुषमा शाह, उपमुख्याध्यापक राजेश शाह, तालुका क्रीडा अधिकारी बोथीकर सर, क्रीडा प्रशिक्षक जगदिश चौधरी, श्रीराम मोडक, शांताराम मंडाले, निंबा माळी, भिकू त्रिवेदी आदींची प्रमुख उपस्थिती होती.
दि.५ ते २० मे दरम्यान जिल्हाभरात क्रीडा प्रशिक्षण शिबिर राबविण्यात आले. यादरम्यान खेळाडूंसाठी हॅण्डबॉल, क्रीकेट, फ्लोअरबॉल, कराटे, ज्युडो, कबड्डी, योगा, टेनिक्वाईट, बॉक्सिंग, बुद्धीबळ आदी खेळांचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी प्रशिक्षण समारोपप्रसंगी बोलतांना श्रीमती सुनंदा पाटील म्हणाल्या की, आजच्या काळात खेळाडूंसाठी क्रीडा क्षेत्रात मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध आहेत. प्रत्येक खेळाडूने त्याचे महत्त्व जाणून घेतले पाहीजे.
प्राचार्या सुषमा शाह म्हणाल्या की, शिक्षणाला कला व क्रीडाची जोड दिली तर खेळाडूंची प्रगती व संस्कारही रुजतील. प्रत्येकाकडे पुस्तकी ज्ञान असते, परंतू त्याचबरोबर क्रीडा गुण असेल तर चांगले संस्कारही रुजतात.
क्रीडा प्रशिक्षक प्रा.डॉ.मयुर ठाकरे म्हणाले की, मुलींना भविष्यातील आव्हानात्मक आयुष्यासाठी मैदानावर खेळू द्या, तिला शारिरिक, मानसिक सक्षम होवू द्या. तिच्या क्रीडा पंखांना बळ द्या, कारण तिच्यासारख्या बलशाली, सामर्थ्यशाली धर्मशील या जगात कोणीही नाही.
क्रीडा शिक्षक जगदिश वंजारी म्हणाले की, मुलांना शारिरीक व मानसिक सक्षम करणे ही काळाची गरज आहे. आणि ती गरज पूर्ण करायची असेल तर मैदानासारखे दवाखाने आपल्या परिसरात उपलब्ध आहेत. त्याचा उपयोग खेळाडूंनी केला पाहीजे.
यानंतर खेळाडूंना प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले. क्रीडा प्रशिक्षक दिनेश बैसाणे, शुभम कर्मा, संतोष मराठे, ज्योती चौधरी, जावेद बागवान, मनिष सनेर, योगेश माळी, नंदू पाटील, भुषण माळी, राकेश चौधरी, भरत चौधरी, आकाश माळी, प्रदीप माळी, गोपाल चव्हाण, राजेश्वर चौधरी, तेजस्वीनी चौधरी, शिवाजी माळी, जितेंद्र माळी आदींनी जिल्हाभरात क्रीडा प्रशिक्षण शिबिर राबविले. कार्यक्रमाचे सूत्रसंचाल प्रा.डॉ.मयुर ठाकर यांनी केले. तर आभार जितेंद्र पगारे यांनी मानले.