नंदुरबार l प्रतिनिधी
शहरातील नवनाथ नगर, नवा भोईवाडा परिसरात मंगळवारपासून कानुमाता उत्सवास प्रारंभ झाला आहे.दरम्यान गुरुवारी सकाळी कानू मातेच्या उत्सवाची सांगता होईल.
बुधवारी कानु माता उत्सवात मिरवणुकीद्वारे कलशधारी सुवासिनींसह युवती आणि महिलांचा विशेष सहभाग दिसून आला. सकाळी पाणी आणणे, रत्ने आणण्यासाठी महिलांनी मिरवणुकीत सहभाग नोंदविला.
अमळनेर येथील दादू भगत यांच्या नेतृत्वाखाली कलशधारी महिलांनी वाजत-गाजत रत्ने आणली. नंदुरबार शहराचे ग्रामदैवत मोठा मारुती मंदिरापासून सवाद्य ध्वज मिरवणूक काढण्यात आली. प्रथेप्रमाणे सोनार, कुंभार, सुतार आणि कन्हेर यांच्या घरून साहित्य आणण्यात आले.
बुधवारी दिवसभर परिसरातील महिलांनी सामूहिक रीत्या सुमारे एक हजार पुरणपोळीचा स्वयंपाक केला. दरम्यान गुरुवारी कानुमाता उत्सवाचा समारोप होईल. सकाळी कानुबाई मातेची भव्य मिरवणूक काढण्यात येणार असल्याची माहिती संयोजक शोभा खेडकर, मोहन खेडकर यांनी दिली.
कानबाई माताची मिरवणूक नवनाथ नगर येथून बालवीर चौक, नवा भोई वाडा, चैतन्य चौक मार्गे पाताळ गंगा नदीवर विसर्जन करण्यात येईल.