मुंबई l
शरद पवारांच्या विरोधात वादग्रस्त पोस्ट केल्याप्रकरणी अभिनेत्री केतकी चितळेला काल पोलिसांनी अटक केली होती. आज तिला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने तिला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. केतकी हिने स्वतः न्यायालयात युक्तिवाद केला. न्यायाधीश वी.वी.राव यांच्या कोर्टात सुनावणी घेण्यात आली.
केतकी न्यायालयात म्हणाली की, मी माझी बाजू स्वतः मांडणार आहे. मी जे काही बोलले तो माझा अधिकार आहे. मी जे काही पोस्ट केले तो माझ्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा भाग आहे. मी कोणी राजकीय व्यक्ती नाहीये. मी राजकीय लीडर नाहीये. मी एक सामान्य व्यक्ती आहे. मी जी पोस्ट केली ती एक प्रतिक्रिया होती. हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा एक भाग आहे. बोलण्याचे लिहिण्याचे स्वातंत्र्य नाहीये का? मी काही मास लिडर नाहीये की माझ्या काही लिहिण्याने कायदा सुव्यवस्था निर्माण होईल. मी केलेली पोस्ट खुशीने आणि मर्जीने केलीये, असे ती म्हणाली. तिने इंग्रजीतून युक्तिवाद केला. तत्पूर्वी न्यायालयाने केतकी हिला तुमचा वकील कोण आहे? अशी विचारणा केली. मात्र मी वकील लावलेला नसून, माझा युक्तिवाद मी स्वतः करणार असल्याचे तिने सांगितले.