नंदुरबार l प्रतिनिधी
गौसेवा आणि वृक्षलागवड ही जगातील सर्वात मोठी सेवा आहे. म्हणून प्रत्येक मानवाने गौसेवा आणि वृक्ष लागवड हा संकल्प काळाची नव्हे तर वर्तमानाची गरज आहे. या दोन्ही सेवेतून पुण्यकर्म प्राप्त होत असल्याचे प्रतिपादन ह.भ.प. रवींद्र पाठक गुरुजी चौपाळेकर यांनी केले.दरम्यान आज बुधवारी कथेची सांगता होईल.
शहरातील कोरीट रस्त्यावरील ओमशांती नगर परिसरात सुरु असलेल्या संगीतमय श्रीमद् भागवत कथेत मंगळवारी रूक्मिणी स्वयंवर देखावा लक्षवेधी ठरला. पश्चिम रेल्वेतील सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक वसंत ओंकार खैरनार यांच्या सेवापुर्ती निमित्त संगीतमय श्रीमद् भागवत कथेचे आयोजन करण्यात आले. या संगीतमय कथेचे निरुपण रकसवाडे येथील कथा प्रवक्ता भागवताचार्य ह.भ.प. रवींद्र पाठक गुरुजी चौपाळेकर करीत आहेत. ते पुढे म्हणाले की, नेहमी भौतिक सुखाकडे धावणार्या मानवाने निसर्गाकडे दुर्लक्ष केल्याने 44 अंशांपर्यंत तापमान पोहोचले. निसर्गाचा समतोल राखण्यासाठी गौसेवा आणि वृक्षलागवड करणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. राकसवाडे येथील गौ, गीता, गोपी, वृक्ष सेवा समितीच्या माध्यमातून गाईंची सेवा, गीता वाटप व शिक्षण, वृक्ष लागवड, वृक्ष दान सेवाकार्य होत असून या पुण्य कार्यास दानशूर दात्यांनी सढळ हस्ते योगदान देण्याचे आवाहन ह.भ.प. रवींद्र पाठक गुरुजी चौपाळेकर यांनी केले आहे. महात्मा ज्योतिबा फुले हायस्कूल जवळील ओमशांती नगरातील प्लॉट क्रमांक 53 येथे श्रीमद् भागवत कथेचीआज दुपारी सांगता असून आज बुधवार दिनांक 11 मे रोजी दुपारी 12 वाजता महाप्रसादाचे वितरण होईल. भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेण्याचे आवाहन संयोजक वसंत खैरनार, रत्नप्रभा खैरनार, छायाचित्रकार नंदू खैरनार आणि परिवारातर्फे करण्यात आले आहे.