नवापूर l प्रतिनिधी
शासकीय पाझर तलाव तात्काळ दुरुस्तीसाठी कार्यवाही करावी तसेच यामुळे भविष्यात काही अनुचित प्रकार उद्भवल्यास शासन जबाबदार असल्याबाबतचे निवेदन सामाजिक कार्यकर्ते उमेश बापु पवार यांचा नेतृत्वाखाली रहिवासी तसेच सह्या करणारे ग्रामस्थ कोठडा ता.नवापूर यांनी तहसीलदार नवापूर यांना दिले.
निवेदनात म्हटले आहे की, आम्ही खालील सह्या करणारे ग्रामस्थ, राहणार कोठडा शिवारातील
तसेच जवळील पाड्यातील नागरिक आपणाकडे विनंती अर्ज सादर करीत आहोत की यापुर्वी शासकीय पाझर तलाव दुरुस्ती करण्यात यावा करीता आम्ही आपणाकडे विनंती केली असून सदर पाझर तलाव तात्काळ दुरुस्त व्हावा जेणेकरुन भविष्यात सदर पाझर तलावाचे पाणी गावात शिरणार नाही व यामुळे जिवित हानी होणार नाही तसेच या परिसरातील शेतीला देखील नुकसान होऊ नये करीता आम्ही यापुर्वी देखील आपल्या विभागाकडे पत्रव्यवहार करुन विनंती केलेली आहे. परंतु आमच्या विनंती अर्जाचा आपल्या कार्यालयाने विचार केलेला नसल्याचे आमच्या निदर्शनास येत आहे व सदरचा पाझर तलाव आहे त्याच परिस्थितीत आज देखील आहे. तसेच सदर पाझर तलावा शेजारी नागरिकांना तसेच वाटसरूंना ये-जा करणेसाठी रस्त्याची देखील मागणी करण्यात आली होती.त्याचा देखील आपल्या विभागाने विचार केलेला नाही.महोदय पुढील महिन्यात पावसाचे वातावरण निर्माण होईल व यामुळे पाझर तलाव भरुन पाणी बाहेर वाहु लागल्यास सदरचे पाणी हे नागरिकांच्या घरात प्रवेश करेल, शेतात जाऊन पिकांचे नुकसान होईल व यामुळे जिवितहानी देखील होऊ शकतो तसेच सदर परिसरात महामार्ग व रेल्वेचे रुळ गेल्याने सदर ठिकाणी पाणी साचल्यास अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.सदर ठिकाणी वेळेवरच आपल्या विभागाकडून योग्य ती कार्यवाही न झाल्यास भविष्यात होणाऱ्या नुकसानासाठी केवळ आपलेच प्रशासन जबाबदार राहील याची कृपया नोंद घ्यावी.निवेदनावर सामाजिक कार्यकर्ते उमेश बापु पवार,प.स सदस्य अमरसिंग गावीत,सरपंच सुरेखा कोकणी,उपसरपंच विरसिंग कोकणी,दिलीप कोकणी,नरेश कोकणी,महादु कोकणी आदि ग्रामस्थांचा स्वाक्षऱ्या आहेत.