नंदुरबार l प्रतिनिधी

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प,तळोदा अंतर्गत तळोदा, अक्कलकुवा व धडगाव या कार्यक्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल पब्लिक स्कुलमध्ये शैक्षणिक वर्ष सन २०२२-२०२३ प्रवेशासाठी इयत्ता सहावीच्या वर्गात नियमित प्रवेश तसेच इयत्ता सातवी ते नववीच्या वर्गातील विद्यार्थ्यांच्या रिक्त जागा भरण्याकरिता अनुसुचित आणि आदिम जमातीच्या विद्यार्थ्यांकडून १५ मे २०२२ पर्यंत ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. सदर प्रवेश प्रक्रियेकरीता ३ टक्के जागा व आदिम जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी ५ जागा आरक्षित असतील. यासाठी अनुसूचित जाती, आदिम जमातीच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न सरासरी ६ लाखापेक्षा कमी असावे. त्याबाबतचा सक्षम प्राधिकार्यांचा दाखला सोबत जोडावा. प्रवेश अर्जासोबत जातीचा दाखला, शैक्षणिक वर्ष २०२१-२०२२ मध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांचे प्रथम सत्र गुणपत्रक जोडावे. एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल पब्लिक स्कुलमध्ये इयत्ता ६ वी च्या वर्गात एकूण ६० विद्यार्थ्यांना गुणवत्ता यादीनुसार व गुणानुक्रमे प्रवेश देण्यात येईल. सदर प्रवेश प्रक्रियेकरीता प्रवेश पूर्व स्पर्धापरीक्षेचे ५ जून २०२२ रोजी सकाळी ११ ते १३ या वेळेत दोन परीक्षा केंद्रावर (अक्कलकुवा तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी ) शासकीय आश्रमशाळा तालंबा, ता.अक्कलकुवा जि.नंदुरबार येथे तर ( धडगाव व तळोदा तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी ) शासकीय आश्रमशाळा सलसाडी ता.तळोदा जि.नंदुरबार या वेळेत आयोजित करण्यात येणार आहे. सर्व शासकीय, अनुदानित आश्रमशाळेच्या मुख्याध्यापकांनी सदर परीक्षेला प्रविष्ट होणार्या शाळेतील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेच्या दिनांकास परिक्षा केंद्रावर सुरक्षितपणे घेवूनजाण्याची व्यवस्था करावी. तर जिल्हा परिषद व इतर शासनमान्य प्राथमिक व माध्यमिक शाळेतील परिक्षार्थी विद्यार्थ्यांना परिक्षा केंद्रावर घेवून जाण्याची जबाबदारी संबंधित पालक, शिक्षकांची राहील. पालकांनी आपल्या अर्जामध्ये पाल्यांना एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल स्कूल करीता प्राधान्यक्रम देता येईल व त्यानुसार निवड झाल्यास त्याच प्राध्यान्यक्रमाने एकलव्य मॉडेल स्कूल मध्ये प्रवेश देण्यात येईल. अर्जांत विद्यार्थ्यांची जन्मतारीखेची अचुक नोंद घेण्यात यावी. प्रवेश अर्जामध्ये नमुद प्रमाणपत्रावर मुख्याध्यापकांची स्वाक्षरी, शिक्का, नाव असणे अनिवार्य असेल. विद्यार्थ्यांना अर्ज भरतांना अर्जात संपर्क क्रमांक अनिवार्य असेल. प्रवेश प्रक्रीयेसंदर्भात अंतिम निर्णय घेण्याचा सर्वाधिकार महाराष्ट्र ट्रायबल पब्लिक स्कुल सोसायटी नाशिक या संस्थेस असेल. एकलव्य मॉडेल रेसिडेंसियल स्कूलमध्ये प्रवेशासाठी अर्ज प्रकल्प कार्यालयात उपलब्ध असून परिपूर्ण अर्ज भरुन १५ मे २०२२ पर्यंत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प,तळोदा येथे जमा करावे. असे आवाहन प्रकल्प अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी डॉ.मैनाक घोष यांनी केले आहे









