म्हसावद l प्रतिनिधी
शहादा तालुक्यातील मनरद येथील जि.प.मराठी. शाळा येथे शालेय विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. पुणे येथील त्रातृ या सेवाभावी संस्थेच्या वतीने आदिवासी भागातील गरजू विद्यार्थ्यांना वह्या, कंपासपेटी,रंगपेटी,पेन,स्केचपेन यासारखे शैक्षणिक साहित्य देण्यात आले.याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच राजू मंगू भिल होते.प्रमुख अतिथी म्हणून शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष वैशाली कुवर,ग्रामपंचायत सदस्य रिता पाटील,बचत गटाच्या भावना ब्रिजलाल पाटील,आरोग्य सेविका मुनेश्वर उपस्थित होते.प्रास्ताविकात मृणाली सिसोदे यांनी त्रातृ या सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून आदिवासी विद्यार्थ्यांना कशी मदत केली जाते या संदर्भात माहिती दिली.शिक्षणापासून कुणीही वंचित राहणार नाही यासाठी संस्था सर्वोतोपरी सहकार्य करण्यास तयार असल्याची माहिती त्यांनी दिली. कविता सिसोदे यांनी शिक्षणाचे जीवनात किती महत्व आहे याबाबत माहिती दिली.कोरोनामुळे विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहापासून काही अंशी दूर गेले त्यांना प्रवाहात आणण्यासाठी त्रातृ ही संस्था उल्लेखनीय कामगिरी करत आहे याचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन भावना पाटील यांनी केले.किर्तिमान सिसोदे यांनी या उपक्रमास अर्थसाहाय्य उपलब्ध करून दिले.या प्रसंगी ग्रामस्थ व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन मुख्याध्यापक दीपक कुलकर्णी यांनी केले व आभार सुनिता निकुम यांनी मानले.